
Karad Municipality Waste Project Scam, Vijay Wategaonkar Karad BJP,
याप्रसंगी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात तीन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आल्याची माहिती वाटेगावकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, सुमित शिंदे, अजय पावसकर, आशुतोष डुबल, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, शारदा माने आणि वर्षा वास्के उपस्थित होते.
वाटेगावकर म्हणाले, घनकचरा प्रकल्पांतर्गत काही अंतर्गत रस्त्यांना ठरावाद्वारे मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्याची नोंद आहे. मात्र प्रकल्प परिसरात संबंधित रस्ते किंवा बगिच्यातील मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित ठराव, मंजुरी प्रक्रिया आणि खर्चाची पडताळणी करून संपूर्ण माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या काही विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसतानाही ती कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली असण्याची शक्यता आहे. विशेषतः बायोगॅस प्रकल्प परिसरातील एका रस्त्याबाबत अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या दैनंदिन कामकाजावरही त्यांनी टीका केली. ओला कचरा योग्य प्रकारे विलगीकरण करून प्रक्रिया करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बेल्ट वाहिनीची दुरुस्ती वेळेवर होत नसणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसणे आणि टेंडरमध्ये नमूद असतानाही कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे परिसरात दुर्गंधी वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरपरिषदेच्या ठराव क्रमांक १६३ (२७ जून २०२३) अंतर्गत सुमारे १ कोटी ८१ हजार ४६६ रुपये खर्चून तांबडी माती टाकणे, शोभेची झाडे लावणे आणि परिसर सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीत अशी कामे दिसून आली नसल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला.
कामे प्रत्यक्षात झाली की नाहीत, तसेच काम न करताच बिले काढण्यात आली आहेत का, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
नगरपालिकेच्या बीपीसीएल व एअरटेलसंबंधीच्या वाटाघाटींमध्ये सत्ताधारी गटातील कोणाचा तरी हस्तक्षेप असल्याची शंका वाटेगावकर यांनी व्यक्त केली. या व्यवहारांबाबतही पारदर्शकता राखून संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विविध विकासकामांसाठी दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या निधी संदर्भात खुलासा मागण्यासाठी भाजप नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची भेट घेतली होती. बुधवारी दुपारी तीन वाजता सर्व नगरसेवकांसमवेत बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
मात्र भाजपचे नगरसेवक वेळेवर पालिकेत उपस्थित राहूनही सुमारे तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता बैठक रद्द झाल्याचा निरोप देण्यात आला. यामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगरपालिकेच्या विकासकामांमध्ये पूर्ण पारदर्शकता राखावी, संबंधित ठरावांची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी करत वाटेगावकर यांनी जनहितासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.