कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे लहान पुल आहे.४० वर्षे जुन्या असलेल्या या पुलाचा पाया हा खचला असल्याची माहिती काही स्थानिक लोकांना मिळाली.त्यानंतर स्थानिक रहिवाशी आणि नेरळ पोलीस यांनी एकत्र येत त्या पुलाच्या बाजूची दुहेरी वाहतूक बंद करुन एकेरी वाहतूक सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे.हा पुल किमान ४०- ५० वर्षे जुना असून या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे.त्यानंतर मागील १०वर्षे आधी रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पुल बांधण्यात आला आहे.मात्र हा पूल कोणत्याही वापराविना बंद असल्याने त्या पुलावर वाहने पार्किंग करून ठेवली जात होती. मात्र रविवारी सायंकाळी सहा वाजता नेरळ गावातील मोहाचीवाडी जवळ असलेल्या त्या लहान पुलाचा एका पायाचा काही भाग कोसळून गेला होता.त्यामुळे पुलाचा संपूर्ण पाया तुटून पडण्याची शक्यता होती.ही बाब त्या ठिकाणी दुकाने असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यावर तत्काळ स्थानिक दुकानदार यांनी तेथील भंगाराची पोती रस्त्यावर आणून टाकली.त्याबद्दल माहिती मिळतच नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे हे देखील तत्काळ पोहचले.त्यांनी या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली आणि कोणताही धोका वाहनचालक यांनी पत्करू नये अशी सूचना केली.
मात्र या पुलाच्या पाया खचला असल्याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.या रस्त्याची देखभाल दुरुस्ती खारपाटील कंपनीकडे आहे.त्यांनी या रस्त्याचे मागील दहा वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही काय? असा सवाल मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी उपस्थित केला आहे.जर कोणालाही माहिती पडले नसते कदाचित मोठा अपघात झाला असता.त्यामुळे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाची पाहणी करावी आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी हालचाली कराव्यात अशी मागणी गोरख शेप यांनी केली आहे.त्याचवेळी या पुलाचा पाया एका बाजूने खचला आहे याची माहिती मिळाल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून २४ तासात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.