नेरळ/संतोष पेरणे : ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर व्हावे यासाठी आरपारची लढाई करण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला.नेरळ मधील नगरपरिषद व्हावी अशी चळवळ उभी करणारे नेरळ नगरपरिषद समितीच्या वतीने ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाल्यास नेरळमधील नागरीकरण आणखी वाढेल आणि शासनाच्या विविध विभागांचा निधी देखील नेरळचे विकासासाठी येईल असा विश्वास निवृत मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी व्यक्त केला.
नेरळ नगरपरिषद व्हावी या चळवळीच्या समितीचे वतीने नेरळ ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांची बैठक येथील बापुराव धारप सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी निवृत्त पालिका मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यावेळी ग्रामस्थांच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान चव्हाण यांना अध्यक्ष करण्यात आले तर बैठकीला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.
त्यात शिवसेनेचे कर्जत तालुका सचिव अंकुश दाभने,भाजप जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर,भाजप महिला आघाडी मंडल अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, बीएसपी चे सिद्धार्थ सदावर्ते,आरपीआय आठवले गटांचे तालुका संघटक अनिल सदावर्ते,शेकापचे नितेश शहा,शिवसेना ठाकरे पक्षाचे उप तालुका संघटक सुधाकर देसाई, युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे,शिवसेना उप तालुका प्रमुख अंकुश शेळके,भाजप मंडल उपाध्यक्ष संतोष धुळे,ग्रामपंचायत माजी सदस्य जयवंत साळुंखे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमोल चव्हाण,मनसे शहर अध्यक्ष सुभाष नाईक,भाजप माजी शहर अध्यक्ष संभाजी गरुड,शहर अध्यक्ष श्रध्दा कराळे,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक दिलीप घुले,जेष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत चंचे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला नेरळ नगरपरिषद चळवळ समितीचे संतोष पेरणे, अभिषेक कांबळे तसेच चिराग गुप्ता,ॲड सम्यक सदावर्ते,प्रीतम गिरी,संदेश साळुंखे,परेश सुर्वे, विशाल साळुंके,किरण झोमटे, सुरज साळवी,धवल कांबळे,रवींद्र ताम्हाणे, दत्ता ठमके,अनंत भोईर,हेमंत चव्हाण,आदी सदस्यांनी मागील एक वर्षापासून ही समिती करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
सिद्धार्थ सदावर्ते यांनी नेरळ गावातील प्लास्टिकची समस्या महत्त्वाची असल्याने नेरळ शहरात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.संतोष धुळे यांनी कचऱ्याचे रस्त्यावरील आक्रमण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असून कचरा रस्त्यावर असल्याची समस्या मांडली.पपेश विरले यांनी नेरळ नगरपरिषद होत असेल तर आजूबाजूचे ग्रामपंचायत यांचा समावेश व्हावा, आम्ही आमची कोल्हारे ग्रामपंचायत यांचा समावेश व्हावा यासाठी आम्ही देखील सर्व कागदपत्र गोळा करू असे मत मांडले.
अंकुश शेळके यांनी शासनाला आम्ही विहित नमुन्यात सर्व माहिती दिली आहे तरी नगरपरिषद तयार होत नाही यात काय अडचण आहे हे शोधायला हवे असे मत मांडले.अंकुश दाभणे यांनी राज्य सरकारकडे आपले प्रस्ताव पोहचले आहेत पण प्रस्ताव मंजूर होत नसल्याने आता अशा निवृत अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे असे मत मांडले.सूर्यकांत चंचे यांनी सरकार नगरपरिषद झाल्यानंतर होणारा खर्च यांचा विचार करीत असेल अशी माहिती दिली.
निवृत्त पालिका मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी नेरळ नगरपरिषद व्हावी असे एम एम आर डी ए चे वार्षिक आराखड्यात नमूद केले असेल तर त्यानुसार पाठपुरावा करू. नगरपरिषद व्हायला हवी एवढी लोकसंख्या नेरळ ग्रामपंचायतीची आहे.त्यामुळे आपण नेरळ साठी रायगड जिल्हाधिकारी तसेच राज्याचा नगरविकास विभाग आणि एम एम आर डी ए कडे पाठपुरावा करण्यासाठी आपण स्वतः वेळ देणार असे आश्वासन दिले.
नगरपरिषद झाली तर सरकारच्या विविध विभागाच्या माध्यमातून निधी मिळेल तसेच बांधकाम परवानग्या आणि विकास परवानग्या यांतून मोठा निधी गोळा होईल.त्यातून शहरात अनेक कामे होऊ शकतात तसेच जगातील दर्जाचं पर्यटन असलेल्या माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचे निधी मिळू शकतात.शहरात येणारे पर्यटक यांच्या माध्यमातून प्रवेश कर गोळा होऊ शकतो.तर नागरी समस्या सोडवण्यासाठी आपणच निर्णय घेऊ शकतो आणि शहराचा विकास आपणच साधू शकतो.त्यावेळी अलिबाग येथे जाण्याची गरज भासणार नाही अशी माहिती दिली.तर नगरपरिषदेच्या विविध विभाग आणि त्यांची कामे यांची सविस्तर माहिती देखील दादासाहेब अटकोरे यांनी दिली.या ग्रामस्थांच्या बैठकीला नेरळ गावात अनेक लोक उपस्थित होते.