
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मतदार जोमात पुढारी कोमात
करमाळा नगरपालिकेसाठी ७३ टक्के मतदान
करमाळा/ दिनेश मडके: करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत (Election) नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असुन सर्वांना विजयाची खात्री असून लक्ष्मी देवी कोणावर कृपा करणार हे पहावे लागणार आहे. मतदार जोमात पुढारी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करमाळा नगरपालिकेची ही निवडणूक यंदा मोठी रंगतदार झाली असून या निवडणुकीमध्ये ७३ टक्के मतदान झाले आहे. तसेच निवडणुकीची मतमोजणी तीन डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला होणार आहे.
नगराध्यक्ष पदाच्या पंचरंगी लढतीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी जगताप, भाजपचे नेते कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनिता दोशी, करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी सौ.मोहिनी सावंत या तिघे मध्ये ही लढत होणार असून राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने भावना गांधी अपक्ष उमेदवार प्रियंका वाघमारे या निवडणुकीला उभ्या आहेत.
करमाळा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या मोठ्या प्रचार सभा ऐवजी प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोचून प्रचार करण्यावर भर देण्यात आला होता. भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा झाली तर शिवसेनेच्या वतीने माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सभा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतदारांना फोनवरून नागरिकांना मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले करमाळा शहर विकास आघाडीची सभा मोठी झाली.
Maharashtra Politics: निकालासाठी 15 दिवसांची प्रतीक्षा; एका मताला 15 ते 20 हजारांचा भाव अन्…
करमाळा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी झाली असून अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे आपले आठ उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार झाली असून मतदारांना प्रत्यक्ष भेटून मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करण्यात आले असून एका मताला तीन ते पाच हजार रुपये देण्यात आल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या कामापेक्षा आर्थिक देवाणघेवाण यावरच मोठ्या प्रमाणात मतदारांनी प्राधान्य दिले असल्याची चर्चा असून मतदार जोमात पुढारी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रथमच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पक्षाच्या चिन्हावर लढले असून सावंत घटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन देण्याचे काम केले आहे.
भाजपकडून महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक संपन्न झाली असून कमळ फुलवण्याचा चंग बांधलेला असुन भाजपाचीच सत्ता नगरपालिकेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे तर शिवसेना नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपले पॅनल उभे करून नगरपालिकेवर भगवा फडकवणार असल्याचा निर्धार केला असुन नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
करमाळा शहर विकास आघाडीच्या सावंत गटाकडून सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, मा.नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत ॲड राहुल सावंत यांनी विठ्ठल आप्पा सावंत भगवान सावंत दादा सावंत गोपाळ बापु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी नगरपालिकेची सत्ता मिळवणार असल्याचा दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार झाले असून करमाळा शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदारांनी आपल्या उमेदवारांना उस्फूर्तपणे मतदान जरी केले असले तरी या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले असून आपला जवळचा वैयक्तिक संबंध बरोबर आर्थिक देवाण-घेवाण याबाबतही मोठ्या प्रमाणात हे संबंध जोपासण्यात आले आहेत.
रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान
सर्व जण निवडणुकीनंतर एकत्र येतात विरोधक सत्ताधारी सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊन सत्तेचा उपभोग घेतात तर आपल्याला पैसे घेण्यास काय हरकत आहे असा मोठा सूर मतदार नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक मोठी चुरशीची झाली असून मतदार जोमात पुढारी कोमात अशी परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाली असून तिघाही मातब्बरांनी आपली सत्ता येईल असा दावा केला असला तरी मतदार राजांनी आपला मत रुपी आशीर्वाद कोणाच्या पारड्यात टाकला आहे हे निकाल आपणाला सांगणार असून 21 डिसेंबरला लक्ष्मी कुणावर कृपा करणार हे स्पष्ट होणार आहे.