Karuna Munde On Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच करुणा मुंडे कडाडल्या; म्हणाल्या, "ते साफ खोटे..."
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळचे संबंध असल्याचा आरोप करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. प्रचंड रोष आणि प्रेशरनंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “दोन दिनवसांपूर्वी मी एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र राजीनामा दिल्यावर त्यांनी जे ट्वीट केले ते की मी आजारपणामुळे राजीनामा देत आहे. ते साफ खोटे आहे कारण काल ते विधानभवनात होते. त्यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर असायला हवा होता.”
पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांच्यात नैतिकता नाहीच आहे. मात्र आता आम्ही शांत बसणार नाही. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी तब्येतीचं कारण दिले आहे. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की, वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा आमच्यासाठी न्याय नाही आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही.”
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रया
संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराचे फोटो समोर आले आहेत. हे पाहून मंत्री पंकजा मुंडे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्यावर हत्येची चित्रफित पाहू शकत नाही. हा अमानुष खून आहे. आरोपींना जात नसते. ते कुठल्याही जातीचे असले तरी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मी संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागते, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला कल्पना नव्हती. आज सकाळी नागपूरला आल्यावर समाज माध्यमांवरून ही माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्यापासून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा दिला असता तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. मी त्याची लहान बहीण असून कुठल्याही परिवारासाठी ही दु:खद घटनाच आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.