गोकुळच्या सत्तासंघर्षात रोहित पवारांची एन्ट्री, फडणवीसांना खुलं पत्र
Kolhapur Gokul Politics : राज्याच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहित सरकारच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खुले पत्र लिहिले असून ‘गोकुळ’ मधील चाललेल्या राजकारणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधत “इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला?” असा खोचक सवाल विचारला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. नागपुरात मुख्यमंत्री ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव’ मोर्चात सहभागी होत असताना त्यांनी आधी स्वतःच्या निर्णयांचं आत्मपरीक्षण करावं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने कौल दिल्यानंतरही शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे लोकशाही आणि संविधानाशी द्रोह नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार यांनी आपल्या पत्रात फडणवीसांवर थेट निशाणा साधला. गोकुळच्या निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री कोल्हापुरात उपस्थित असतानाही विजयी मिरवणूक काढता आली नाही, यामुळे त्यांचा इगो दुखावला असावा, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आज नागपुरात आपण ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढत आहात, पण हा मोर्चा काढण्यापूर्वी आपण स्वतःच आत्मचिंतन करायला पाहिजे. ‘गोकुळ’मध्ये शेतकऱ्यांनी लोकशाहीमार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केलं असताना देखील शासन नियुक्त सदस्य नेमून ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा मनसुबा म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का? लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा आपणास नैतिक अधिकार आहे का? हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारावेत. गोकुळच्या निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक आहे, परंतु इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हा निर्णय म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यामुळं वेळ आहे तोवर निर्णयात दुरुस्ती करा! @Dev_Fadnavis
@satejp #Gokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 5, 2026
मात्र, वैयक्तिक इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हा निर्णय म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी विरोध केला आहे. आता रोहित पवार यांनीही या निर्णयात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे गोकुळचा मुद्दा आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यातील विरोधी पक्षांचे नेतेही या प्रकरणावरून सरकारला प्रश्न विचारत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या टीकेला काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: गोकुळमध्ये चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावरून रोहित पवार यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. 'इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला?' असा सवाल त्यांनी केला.
Ans: रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहिलं.
Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या.






