अवैध सावकारांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; शिरोळ तालुक्यात खळबळ
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील नांदणी व हातकणंगले तालुक्यातील शहापूर, तारदाळ व नेज या गावांतील तिघा गैरअर्जदारांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत अवैध सावकारी प्रकरणी १५ जुलै रोजी धाडसत्र राबवण्यात आले. या धडक कारवाईमुळे कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्यात सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अनेकांनी सावकारांकडून होणाऱ्या त्रासामुळे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेकायदेशीर सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे. प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने करून बेकायदेशीर सावकारीला आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. नांदणी येथील एका घराची तपासणी करण्यात आली.
हेदेखील वाचा : “द्रौपदीप्रमाणे महाराष्ट्राचे वस्त्रहरण, धर्मराजाप्रमाणे फडणवीस खाली मान घालून…; शिवसेनेच्या खासदारांचा घणाघात
अद्याप आक्षेपार्ह कागदपत्रे सापडलेली नसली तरी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी १ अधिकारी, ११ कर्मचारी व ८ पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली ही संयुक्त कारवाई पार पडली असून, अशीच कारवाई शिरोळ तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४ पानी सुसाईड नोट लिहून ठेवलं आहे. त्या चिट्ठीत राजकीय व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता कोल्हापूरच्या शिरोल तालुक्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे.