खासदार संजय राऊत यांनी विधमंडळामध्ये झालेल्या राड्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Padalkar vs Awhad : मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. विधीमंडळाच्या आवारामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. काल विधानभवनात जो प्रकार घडला महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारा आहे, असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “हे टोळी युद्ध आहे, गॅंगवॉर आहे. काल विधानभवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही, दुःखद नाही, धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की, मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन, संस्कृती बदलू देणार नाही. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीत रोज डाग लागत आहे. अनेक मार्गाने लागत आहे. भ्रष्टाचार असेल, हनी ट्रॅप असेल, आमदार निवासमध्ये टॉवेल गॅंग असेल, मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, कारवाई होत नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत म्हणाले की, “मला देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का? ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात हे सगळे बसतं आहे का? त्यांच्या राज्यात सगळे सुरू आहे मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेत देवेंद्र फडणवीस आहेत . वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होतं, पांडव कमजोर होते, म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण ते उघड्या डोळ्याने पाहत होते. द्रोपदीला जुगारावर लावणाऱ्यांची संस्कृती जी या देशात निर्माण झाली होती मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्याने महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“या प्रकरणातील आरोपी हे काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये होते. कोणी आणलं त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं स्पष्ट मत झालं की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटचं लागायला पाहिजे. म्हणजे राज्य नियंत्रणात ठेवता येईल. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते की हे सरकार बरखास्त करा, येथे राष्ट्रपती राजवट लावा. त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल माझ्या राज्यात राष्ट्रपती लागवट लावण्याच्या लायकीचे झाला आहे,” असा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे.