Crime News
उत्तूर : कोल्हापूरच्या आजरा येथील एका नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यातील दुर्दैवी बाब म्हणजे या दाम्पत्याचा महिनाभरापूर्वी विवाह झाला होता. आता यांचा गॅस गळतीमध्ये मृत्यू झाला.
सागर सुरेश करमळकर (वय ३२) व सुषमा सागर करमळकर (वय २६) असे गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झालेल्या जोडप्याची नावे आहेत. सागर आणि सुषमा या दोघांचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर त्यांच्या भावेश्वरी कॉलनी येथील नवीन घरामध्ये असताना त्यांचा फोन उचलला जात नव्हता.
हेदेखील वाचा : आधी पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले, नंतर पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार; बीडमध्ये दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा
दरम्यान, नंतर फोन ‘स्विच ऑफ’ झाल्याने मित्र परिवाराने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गिझरचा गॅस कोंडून बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याचे समजते. घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती.
कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त
प्रचंड मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर अधिक तपास करीत आहेत.
हेदेखील वाचा : वर्दळीच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या, आरोपीचा शोध सुरु