
विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजता गोखले कॉलेज चौकात घडली. वाय. पी. पोवार नगर येथून मंडळाची भव्य गणेशमूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. मूर्ती एका पायावर उभी आणि काहीशी झुकलेल्या स्थितीत होती. मिरवणूक गोखले कॉलेज चौकात पोहोचल्यानंतर मार्गावरील विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श झाला अन् क्षणात होत्याच नव्हत झालं. त्यानंतर मूर्तीचा तोल गेला आणि काही क्षणांतच बाप्पाची मुर्ती रस्त्यावर कोसळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यकर्ते आणि उपस्थित गणेशभक्तांमध्ये एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने कोसळलेली मूर्ती रस्त्यातून बाजूला केली. दरम्यान, या घटनेनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. गणेशमूर्ती ज्या मार्गाने विसर्जनासाठी नेण्यात येणार होती, त्या मार्गावरील विद्युत तारा तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांबाबत संबंधित यंत्रणांना आधीच विनंती करण्यात आली होती; मात्र आवश्यक पूर्तता झाली नसल्याने दुर्घटना घडल्याचा दावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, महावितरणने मंडळाचा दावा फेटाळला आहे. या घटनेत महावितरणचा दोष नसल्याचे सांगत आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली होती, असे महावितरणचे म्हणणे आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची पथकेही परिसरात उपस्थित होती. वाय. पी. पोवार नगर येथून गोखले कॉलेजपर्यंत मूर्ती आणताना आवश्यक त्या ठिकाणी महावितरणच्या पथकाने मदत केल्याचा दावाही करण्यात आला आहे. मंडळ आणि महावितरणकडून या घटनेबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र 21 फुटी गणेशमूर्ती अचानक कोसळल्याने विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहाला काही काळ गालबोट लागले आणि गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त झाली.