
शिरोली : बळीराजाच्या शेतातल्या ऊसाला योग्य तो दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघ आक्रमक झालेला आहे. जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हालोंडी येथे रोखली.दरम्यान घटनास्थळी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांनी दर निश्चित होत नाही. तोपर्यंत ऊसतोडणी थांबवू असे आश्वासन दिले. हालोंडी (ता. हातकणंगले) येथे रविवारी सकाळी हेरले गावातील ऊसाची वाहतूक होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांना समजले. त्यांनी ते वाहन अडवून चालकाकडे ऊस तोडणीबाबत माहिती विचारली असता त्याने हा ऊस हेरले येथून भरून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याला घेऊन जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व अकिवाट गावचे सरपंच विशाल चौगुले, सुधाकर पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, विजय पाटील, अनिल पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कारखाना संचालकांच्या विनंतीनंतर सोडले वाहन
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांना फोनद्वारे ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली अडविली असल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील घटनास्थळी आले. यावेळी त्यांनी जोपर्यंत दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी थांबवली जाईल, असे आश्वासन दिले. अडवलेला ट्रॅक्टर टॉली सोडा, अशी विनंती केल्यावर ट्रॅक्टर टॉली सोडण्यात आली.
यावेळी कारखान्याचा कर्मचारी, संचालक व संघटनेचे कार्यकर्ते यांचा संभाषणाचा व्हिडीओ शुट करत असल्याचे आकिवाटचे सरपंच विशाल चौगुले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व्हिडिओ शूट करणाऱ्यावर संतप्त झाले. आम्ही कुणाला घाबरत नाही, आम्ही झाकून काय करत नाही, ट्रॅक्टर अडवल्यावर तुम्ही इतकी तत्परता दाखवताय, तर मग ऊस दराबाबत का तत्परता दाखवत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. कारखानदारावर एवढे प्रेम दाखवता तसे प्रेम शेतकऱ्यांवर ही दाखवा. म्हणजे शेतकऱ्याला त्याचा घामाचे दाम मिळेल, असेही सुनावले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही दिवसांपूर्वी देखील शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्र वळण मिळाले. रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर) रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) शिरोळ शहरात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला.