कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला तीव्र वळण मिळाले आहे. रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवारी (दि. 31 ऑक्टोबर) रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) शिरोळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या.
दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला 3400 रुपये प्रति टन ऊस दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, कारखाना फक्त एफ.आर.पी. एवढाच दर देत असून, साखर व इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही. या पार्श्वभूमीवर बुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी ऊस तोडीला सुरुवात केल्याचे लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ट्रॅक्टरसमोर उभे असताना त्यांना ओढत नेण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ शहरात शनिवारी बंद पाळण्यात आला असून, युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जर योग्य दराचा तोडगा तातडीने निघाला नाही, तर संपूर्ण शिरोळ तालुका बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. या घटनेनंतर ऊस दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऊसाला चांगला भाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरु असाताना शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार जिल्हा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सीमाभागातील शेडशाळ, आलास, पाचमैल परिसरात संघटनेच्या कार्यकत्यांनी रस्त्याकडेला तंबू उभारले असून खुर्चा लावून ऊस वाहतूक रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कर्नाटकातील कारखान्यांकडे ऊस वाहतूक होऊ नये, यासाठी दिवस-रात्र लक्ष ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वीकारली आहे.या वर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखानदारांनी प्रति टन 3400 ते 3450 रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा दर फसवाठरवत उसाला योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ, पाणी व खतांच्या दरात वाढ आणि साखरेच्या बाजारभावातील फरक लक्षात घेता सध्याचा दर अन्यायकारक असल्याचे मत संघटनेने मांडले आहे.






