''लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असल्यास देवभाऊंना...''; मंत्री सुरेश खाडेंच्या वक्तव्याने महायुतीत वाद पेटणार?
राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रूपये जमा केले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र विरोधकांनी या योजनेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले आहेत. सुरेश खाडे हे सांगलीत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही योजना सुरू राहण्यासाठी हेच सरकार कायम ठेवण्याबाबत आवाहन केले आहे. योजना चालू राहणार की नाही राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. योजना चालू राहण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे शासन बदलू देऊ नका. योजना आम्ही पुढेही चालू ठेवू. योजनेचे पैसे वाढवले जातील. यापुढे देवाभाऊ मुख्यमंत्री होतील यासाठी आपण प्रयत्न करू, असे कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले आहेत. राज्यभरात लाडकी बहीण योजेनच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असताना सध्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हे बॅनर चर्चेत आल्याचे दिसत आहे.
राज्यभरात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान काल मुंबई यथे आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आज सावित्रीच्या लेकी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तुम्ही आज जो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो. लोक मला अनेक वेगवगेळ्या नावाने हाक मारतात. पण माझ्या बहिणी जेव्हा मला देवभाऊ म्हणतात ते मला सर्वात जास्त आवडते. जो पर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाहीत, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत. जोपर्यंत यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळणार नाहीत तोपर्यंत विकसित भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. ” तर राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तसे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.