Lalbaug Raja Annachhatra closed for Maratha protester Viral Message fact check Mumbai news
Lalbaug Annachhatra News: मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले असून हजारो मराठा बांधव हे मुंबईमध्ये जमा झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून संपूर्ण मुंबईमध्ये मराठा बांधव जमले आहेत. त्यांनी रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन आणि मोकळ्या जागी तळ ठोकले आहेत. मात्र लालबागच्या राजा मंडळाने मराठा आंदोलनामुळे अन्नछत्र बंद केले असल्याचा दावा केला जातो आहे. यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुंबईतील लालबागचा राजा हा अत्यंत लोकप्रिय गणपती आहे. फक्त मुंबईतून नाही तर संपूर्ण देशातून लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविक येत असतात. कोट्यवधी रुपयांची देणगी लालबागच्या राज्याला जमा होत असते. यामुळे यंदाच्या वर्षी लालबागच्या मंडळाने अन्नछत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक लालबागचा राजा मंडळाने यावर्षीपासून गणेशोत्सव काळात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद स्वरुपात जेवण देण्याचे ठरवले होते. मात्र ते बंद ठेवल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे हे अन्नछत्र बंद ठेवले असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मुंबईतील खाऊ गल्ल्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जाणून बुजून खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या असल्याने आंदोलकांचे हाल होत असल्याचाही आरोप होत आहे. असाच आरोप लालबागचा राजा मंडळावरही होत आहे. मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरु असल्यामुळे हे अन्नछत्र बंद ठेवले असल्याचा आरोप लालबाग राजाच्या मंडळावर केला जात आहे. याबाबत सोशल मीडियावर मेसेज देखील व्हायरल झाला असून यामागचे खरे कारण समोर आले आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
सोशल मीडियावर लालबाग राजा मंडळाने मराठा आंदोलनामुळे अन्नछत्र बंद केले असल्याचा आरोप असलेला मेसेज व्हायरल होत आहे. “मुंबईत लालबागचा राजा नावाच्या गणपतीचे मंडळ आहे. यांचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून बंद ठेवले. करोडो रुपयाची यांना वर्गणी दान मिळते पण यांच्यात मराठ्यांबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा. लालबागचा राजा कसा आहे? हे महाराष्ट्र आणि मराठ्यांना दाखवून दिले,” असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या व्हायरल मेसेजमागचे सत्य मात्र वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाने अन्नछत्र ठेवण्याचे घोषित केले आहे. लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सव काळात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद स्वरुपात जेवण देण्याचे ठरवले होते. मात्र यासाठी मुंबई महापालिकेने अन्नछत्रासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा हा महाप्रसादाचा उपक्रम होऊ शकणार नाही. लालबागचा राजा मंडळाने अन्नछत्रासाठी पेरू कंपाऊंड उभारलेल्या मंडपालाही मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे हे अन्नछत्र उपक्रम सुरु राहू शकला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमधून चुकीचा संदेश पसरवला जात आहे.