गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट, डॉल्बीला बंदी; 'या' ठिकाणी घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय (सौजन्य - सोशल मिडीया)
सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदाही हा वापर होण्याची शक्यता आहे. डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटमुळे मिरवणूक बघण्यास आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेशोत्सव मंडळाकडून डॉल्बी सिट्रीम व लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना डॉल्बी सिस्टीममुळे कानाचा व हृदयाचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
तसेच लेझर नाईट डोळ्यावर पडल्यास वयोवृध्द व लहान मुलांच्या डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आयोजित मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा शो वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
डॉल्बीच्या विरोधात रॅली
अनेक सणानिमित्त डॉल्बी-डीजे वाजवला जातो. दहीहंडी, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात डॉल्बी वाजवला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून याला विरोध केला जात आहे. त्यानुसार, सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी 18 ऑगस्ट रोजी गोल बाग ते पालकमंत्री निवास रॅली काढली होती. नागरिकांना अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बीला विरोध हा या रॅलीचा संदेश होता. त्यानंतर आता सोलापुरात लेझर लाईटसह डॉल्बीला बंदी घालण्यात आली.
हेदेखील वाचा : Manoj Jarange News: जरांगेंच्या मागण्या,उपसमितीला आदेश; फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या गुप्त बैठकीत काय ठरलं?