
large crowd of workers supporters and political leader gathers in Baramati due to Ajit Pawar accidental death
Ajit Pawar Passed Away : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुंबईहून अजित पवार हे सभेसाठी बारामतीला येत होते. विमान लॅडिंग दरम्यान कोसळल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीकरांना अश्रू अनावर झाले असून बारामतीच्या आसपासच्या गावातून लोक बारामतीमध्ये दाखल होत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK आहे. हे विमान सध्या VSR एव्हिएशन चालवत होते. अपघातग्रस्त विमान Learjet 45XR होते. विमान लॅंडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला. विमान अपघात झाल्या ठिकाणी मोठा स्फोट झाला आणि आगीच्या धूराचे लोट दिसून आले. या ठिकाणी अग्निशनम दलासह रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विमानाची आग विझवण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी बारामतीकरांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दुर्घटनास्थळी समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
घटनास्थळाहून तीन पार्थिव ताब्यात घेण्यात आली होती. या पार्थिंवांना बारामती रुग्णलायामध्ये घेऊन जाण्यात आले होते. बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. रुग्णालयाबाहेर जनसमुदाय अक्षरशः लोटला आहे. संपूर्ण बारामती ही अजित पवारांची समर्थक आहे. त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे प्रत्येक बारामतीकर धाय मोकलून रडत आहेत. बारामती पोरकी झाली अशी भावना बारामतीकर व्यक्त करत आहे. बारामती रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून लोकांची गर्दी वाढत आहे.
बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
बारामतीमध्ये सर्वच राजकीय नेते दाखल होत आहेत. त्याचबरोबर सामान्य माणसे आणि कार्यकर्त्यांनी देखील बारामती गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जाणारे सर्व रस्त्यांवर गर्दी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आसपासच्या गावातून समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये दाखल होत आहेत. बारामती मधील दुकाने देखील बंद झाली असून सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. बारामतीमधील लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असून रुग्णालयाकडे समर्थक धाव घेत आहेत. त्यामुळे पोलिसांवर देखील ताण येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही…; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रीया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बारामतीमध्ये दाखल होत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील मंत्री, राजकीय नेते आणि राष्ट्रवादीचे नेते हे बारामतीकडे रवाना झाले आहेत.