
एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
लातूर : गणेशोत्सव सुरू होत आहे. श्री गणेशाच्या आगमनापूर्वी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांचे तात्काळ निलंबन करा, अन्यथा महाराष्ट्रातही पुणे किंवा मुंबई येथे ‘जंतर-मंतर ‘वरील आंदोलनासारखे आंदोलन होईल, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणावर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना आमदार पवार यांनी हा इशारा दिला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात जबाबदार असलेल्या अध्यक्ष व सचिवांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली.
एमपीएससीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी मुंढे हवेत
एम पी एस सी चे अध्यक्ष पद हे संविधानिक पद आहे. पेपरफुटी प्रकरणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरत असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनाही तितकेच जबाबदार धरले गेले पाहिजे. राज्य लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र अध्यक्ष नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेतात, असे सांगत रोहित पवार यांनी याबाबत आक्षेप नोंदविला. जोपर्यंत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला अध्यक्षपदी नेमत नाहीत तोपर्यंत एमपीएससी मधील भ्रष्टाचाराची भेसळ संपणार नाही, असे सांगत एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे जाऊ शकतात, असेही रोहित पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या लढ्यात कायम सोबत राहणार
मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत टप्प्याटप्प्याने आपणाला ऑफलाइन परीक्षा घेता येईल, असे वक्तव्य केले होते. यावर आक्षेप घेत टप्प्याटप्प्याने लाडक्या आमदारांची इन्स्टट्यूट काढून, या इन्स्टट्यूट च्या माध्यमातून एमपीएससीची परीक्षा घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकारने कोचिंग क्लासेस संदर्भात नवीन कायदा आणण्याचे ठरविले आहे. मात्र हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या क्लासेससाठी हा कायदा फायद्याचा आहे. 25 विद्यार्थी असलेल्या छोट्या क्लासेससाठी हा कायदा महाराष्ट्रात ठरणार असून याबाबत आगामी अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब व कष्टकऱ्यांची मुले देतात. त्यामुळे या मुलांनी एकजूट कायम ठेवावी तरच या लढ्यात यश मिळेल. आपण या मुलांच्या सोबत या लढ्ह्यामध्ये कायम राहू रस्त्यावर लढा देण्यास तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत तयार आहे, अशी ग्वाहीही यावेळी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी अभय साळुंखे यांचेही दमदार भाषण झाले. या मोर्चात एमपीएससीचे विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, क्लास चालक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.