ठाकरेंच्या शिवसेनेत गळतीला सुरुवात, 'या' माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
अहिल्यानगर/ गिरीश रासकर: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झाडल्या गेल्या. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना राम राम करण्याचा चंग बांधला असून पक्षातील निष्ठावंत सैनिकांना या निवडणुकीत पुन्हा एकदा डावल्याचे भावना या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती.
विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते हे उमेदवारी न मिळाल्याने चांगलेच नाराज झाले होते याच नाराजीचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तसेच जिल्ह्यातील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील अशी चर्चा नगरमध्ये चांगली रंगत होती. या वृत्ताला आता पुष्टी मिळाली असून आज ठाकरेंच्या सेनेला गळती सुरू झाली आहे. नगर शहरातील निष्ठावंत सैनिकांसह काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
अहिल्यानगर शहरातील या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने ठाकरे सेनेला चांगला धक्का बसला असून सेनेतील उर्वरित माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या सर्वांच्या प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेत ठाकरेंच्या सेन्याऐवजी एकनाथ शिंदेंच्या सेनेचा झेंडा महानगरपालिकेत फडकणार हे जवळपास निश्चित झाल्याचे दिसते आहे.
आज झालेल्या पक्षप्रवेशामध्ये शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक असलेले अहिल्यानगर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, शोभना चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या पक्षप्रवेशाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या सेनेत गळतीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित ठाकरेंच्या सेनेतील माजी महापौर, माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी पक्षप्रवेशक कोण कोण पक्ष प्रवेश करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…
दरम्यान वरील पक्षप्रवेशावेळी लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले दिलीप सातपुते यांनी देखील आज या नगरसेवकांसोबत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या गुपचूप प्रवेशाची सध्या शहरात चांगली चर्चा रंगली आहे. शिवसेना फुटी नंतर शहरातून एकनाथ शिंदे सोबत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिलीप सातपुते यांचा समावेश होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना शहराचे प्रमुख पदी निवड करत शहराची धुरा दिली होती.