छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shiv Sena MLA Disqualification) निर्णयावरुन ठाकरे गट (Thackeray group) आक्रमक झाला आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना खुलासा करण्याची विनंती केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे महाराष्ट्र दौरे वाढल्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र राज्याची भीती वाटत असल्यामुळे ते सतत येतात’ अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांना भाजपची ऑफर आली आहे का या प्रश्नाचे चोख उत्तर दिले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी महापत्रकार परिषदेमधील मुद्द्यांचा खुलासा करण्याची विनंती केली. दानवे म्हणाले, “टीका तर होणार कारण आमच्या प्रश्नाला उत्तर अपेक्षित आहे. नार्वेकरांनी निकालावर खुलासा करावा. आम्ही दिलेले मुद्दे चूक आणि खोटे असल्यास त्याचा खुलासा करावा. आमच्या मुद्द्यावर खुलासा करण्याची मी त्यांना नम्र विनंती करतो” असे अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे यांनी पंतप्रधानांच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन भाजपला घेरले. “महाराष्ट्र राज्याची भीती असल्याने पंतप्रधान वारंवर येतात. इथल्या नेतृत्वामध्ये धमक नाही म्हणून वरिष्ठ लक्ष देत असतील. हर घर छत ही घोषणा केली मात्र 2 टक्के ही काम पूर्ण झाले नाही.फक्त पोकळ घोषणा करत आहेत” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला. तसेच राम मंदिर हे बाबरी मशीदच्या जागी न बांधता तीन चार किलोमीटर लांब बांधले असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानाला देखील अंबादास दानवे यांनी दुजोरा दिला. “राम मंदिराचे आधी कुलूप राजीव गांधी यांनी उघडले मात्र काँग्रेस का बोलत नाही माहीत नाही?” असे देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत.
अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षांतर दिले उत्तर
दोन दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना व त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर अंबादास दानवे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. अंबादास दानवे म्हणाले, “जिथं जो जिंकतो त्या व्यक्तीला भाजप आपल्याकडे आणायचा प्रयत्न करतो. काँग्रेसचे लोकं आणि राष्ट्रवादीचे लोकं भाजपमध्ये आहेत. आपला निवडून येत नाही म्हणून भाजप लोकांचे घेवून येतात. सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर दिली तरी ते कुठे जाणार नाहीत. ऑफर सर्वांना येत असतात” असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला. तसेच “माझ्यावर जाळे टाकले तर मी जाळ्यात येणार नसून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. दोन तुकड्यांना कशाला मन करायचे. तुकडा टाकलेला एक भाकर पेक्षा चतकोर हक्काची खाल्लेली बरी.” असे मत अंबादास दानवे यांनी आपल्या पक्षांतरावर व्यक्त केले.