
वारकऱ्यांच्या चरणांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा,या भावनेतून उभारण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ उपक्रमांनी यंदाच्या आषाढी वारीला सेवाभाव, स्वच्छता आणि सुयोग्य व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून दिला. या उपक्रमांच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर, स्वयंसेवक, स्वच्छतादूत आणि प्रशासनाचे विशेष कौतुक करत, वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे आणि महाराष्ट्र धर्माचे दर्शन घडले, असे गौरवोद्गार काढले.
पंढरपूर पंचायत समिती येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे आयोजित समारोप सोहळ्यात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि भक्तीमार्गाचा सन्मान राखत वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या ‘निर्मल वारी’ उपक्रमाला २०१७ पासून अर्थसंकल्पीय पाठबळ देत त्याचा व्यापक विस्तार करण्यात आला. आज या उपक्रमामुळे लाखो वारकऱ्यांसाठी शौचालये, स्नानगृहे, स्वच्छता व्यवस्था आणि निवाऱ्याच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
यंदाच्या वारीत १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर, ७.८० लाख चौरस फूट जलरोधक मंडप, ५ हजार फिरती शौचालये आणि इतर अत्यावश्यक सुविधा उभारण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींसह विविध दिंड्यांसाठीही स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या. ३० ते ३५ लाख वारकरी पंढरपूरात दाखल होऊनही शहर स्वच्छ राहिले, हीच ‘निर्मल वारी’ उपक्रमाची खरी यशोगाथा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्रभागा नदी परिसर आणि वाळवंट स्वच्छ ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. वारी संपल्यानंतरही पंढरपूर अशीच स्वच्छ राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, हिरकणी कक्ष, रुग्णालये, मोबाईल चार्जिंग वाहने, जर्मन हँगर, शौचालये, स्नानगृहे आणि सुरक्षित मुक्कामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. स्वच्छतादूतांनी ही जबाबदारी नव्हे तर सेवा म्हणून पार पाडल्यामुळे यंदाची वारी साथीच्या रोगांपासून मुक्त राहिली, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वारीसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचा आढावा सादर केला. यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा, ‘चरणसेवा’ उपक्रमातील डॉक्टरांचा, सेवाभावी संस्थांचा आणि स्वच्छतादूतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ या उपक्रमांवरील माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्था आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या आषाढी वारीत भक्तीबरोबरच स्वच्छता, आरोग्य आणि सेवाभावाचा संगम घडवत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ उपक्रमांनी पंढरीच्या सेवेला नवे अधिष्ठान दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.