Mahabaleshwar Panchgani included in UNESCO Natural Heritage List
Mahabaleshwar Panchgani in UNESCO list : सातारा : महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये कासपठारनंतर आता आणखी दोन स्थळांचा समावेश झाला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन स्थळांचा समावेश युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाणे, स्ट्रॉबेरीचे उत्पादन आणि जैविविधता यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीला हा मान देण्यात आला आहे.
युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या ताप्तपुरत्या यादीमध्ये महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश करण्यात आला आहे. या दोन ठिकाणांसह आणखी सहा स्थळांचा समावेश या यादीमध्ये आहे. युनोस्कोच्या भारतातील स्थायी समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी हे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 1985 मध्ये घोषित करण्यात आलेल्या कोयना अभयारण्याचा भाग आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने या परिसराला भू-वारसा स्थळ (जिओ हेरिटेज साइट) म्हणून मान्यता दिली आहे. या परिसरात निसर्गाची मोठी किमया दिसून येते. या क्षेत्रात प्राणी, पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती, संकटग्रस्त प्रजाती आढळतात. हा परिसर भारतातील चार प्रमुख जैवविविधता हॉट स्पॉट पैकी एक असलेल्या पश्चिम घाटाचा भाग आहे. याची दखल आता युनेस्कोकडून देखील घेण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाचगणी आणि महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे निसर्गाच्या विविध सौंदर्य आणि जैवविविधता दिसून येते. येथील दख्खन ट्रॅप्स हे जगातील सर्वात महत्त्वाच्या बॅसॉल्टिक ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक मानले जातात. हे ठिकाण दख्खन ज्वालामुखी प्रदेशाचा भाग असून, ते सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी उदयास आले. फ्लड बॅसॉल्ट ज्वालामुखी या प्रकाराच्या अभ्यासासाठीचे हे आदर्श ठिकाण आहे. त्यामुळे या प्रदेशाला जागतिक स्तरावर भौगौलिक महत्त्व आहे. तसेच, हा भाग पृथ्वीच्या इतिहासातील सर्वांत जास्त घडामोड झालेल्या ठिकाणांपैकी एक असून याचा केटेशस-पेलिओजिन वंशविनाश’ घटनेशी थेट संबंधित असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परिसरात सुस्थितीत जतन झालेली धरबद्ध रचना, लाव्हाच्या प्रवाहांचे थर, प्राचीन मृदा यामुळे पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास शास्त्रज्ञांना सलग उपलब्ध होतो. प्राचीन काळापासून महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वैज्ञानिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारशाचे अनोखे मिश्रण या ठिकाणी दिसून येते. या सर्व कारणांमुळे महाबळेश्वर, पचिगणी हा दख्खन ट्रॅप प्रदेश युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीसाठी सक्षम दावेदार ठरू शकतो, अशी माहिती युनेस्कोने संकेतस्थळावर देण्यात आली आहे.