स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच संतोष बांगरांचा 'मास्टरस्ट्रोक'; 'या' निवडणुकीत विरोधकांना चेकमेट (File Photo)
हिंगोली : आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 18 पैकी तब्बल 17 जागांवर विजय मिळवत बांगर गटाने एकहाती सत्ता काबीज केली. सोमवारी पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत दत्तराव बोंढारे यांची सभापतिपदी आणि संजय भुरके यांची उपसभापतिपदी निवड करून बांगर यांनी विरोधकांना थेट चेकमेट दिले.
भुरके यांच्या निवडीने आदिवासी समाजात आनंदाची लाट उसळली असून, या निर्णयामुळे कळमनुरी मतदारसंघात शिंदे सेनेला आदिवासींचे ठोस पाठबळ मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आखाडा बाळापूर बाजार समितीवर जवळपास मागील वीस वर्षांपासून बोंढारे यांची सत्ता होती. सुरुवातीचे दहा ते बारा वर्षे संजय बोंढारे सभापती होते. यानंतर त्यांच्या चिरंजीव दत्ता बोंढारे यांच्याकडे सत्ता होती. असे असले तरी शिवसेना शिंदे गटातूनच नाराजी व्यक्त केली जात होती. आणि मतपेटीतून दिसूनही आले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मागील पंधरा दिवसांपासून त्यांच्या मातोश्री आजारी असल्याने मुंबईत होते. परंतु शेवटच्या दोन दिवसात आमदार मतदारसंघात आले आणि त्यांनी प्रचाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. आमदारांच्या जादूच्या कांडीमुळे बाजार समितीवर झेंडा फडकवला.
बाळापूर आणि पिंपळदरी सर्कलने तारले
पिंपळदरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोतरा आखाडा बाळापूर आणि पिंपर तीन सर्कल होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतल्याने फार मोठा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही. उलट आखाडा बाळापूर आणि पोतरा या सर्कलवर शिवसेना शिंदे गट मागे होता. आखाडा बाळापूर सर्कलच्या मतमोजणी ६० ते ७० मतांनी शिंदे सेना मागे होते. तर पोतरा सर्कलच्या मतमोजणीत दहा ते वीस मताचा फरक होता. मात्र, पिंपळदरी सर्कलच्या पेट्या उघडताच चित्र बदलले. या सर्कलच्या २११ मतांपैकी १२ मते बाद झाली.
काही मते शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात
उर्वरित १९९ मतापैकी १४९ मते शिंदे सेनेच्या पारड्यात पडली. हा भाग आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या भक्कम पाठबळामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला बाळापुर बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करता आले. या आदिवासी समुदायाने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर शिंदे सेना विजय झाली आणि याची पावती म्हणून संजय भुरके यांना उपसभापतिपद देण्यात आले.