'महादेवी'साठी महाराष्ट्राचे डोळे पाणावले; हत्तीणीला वनताराला नेलं अन् गावकऱ्यांनी अंबानींचं 'JIO' चं बॅन केलं
१. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
२. सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती कडून अंबानीच्या निषेधाचा ठराव मंजूर
३. मोबाईल नंबर पोर्ट मोहीम सुरू
कोल्हापूर: नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे , ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे. दरम्यान , काही समाज बांधवानी रोष व्यक्त करताना जिओ इंटरनेटचे कनेक्शन बंद करून किट ची तोडतोड केली. जैन धर्मीयांच्या मते, वनतारा प्रकल्पाचा थेट संबंध रिलायन्स उद्योग समूहाशी आहे, आणि त्यामुळेच ते जिओ ही कंपनी यासाठी अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचे मानत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो जैन कुटुंबांनी आपले सध्याचे जिओ नंबर अन्य नेटवर्कवर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महादेवी हत्तीणीचा इतिहास
महादेवी ही हत्तीण नांदणी जैन मठात गेली अनेक वर्षे धार्मिक वातावरणात वाढली होती. मठाच्या सेवेकऱ्यांनी तिला आपल्या लेकरासारखे जपले. सण-उत्सवांमध्ये तिचा सहभाग, यात्रांतील समारंभ, बालकांसोबतचा स्नेहभाव ह्या सर्व गोष्टींमुळे ती केवळ हत्तीण नव्हे, तर श्रद्धेचा एक सजीव भाग बनली होती.
वनविभागाची कारवाई
वन्यप्राणी संरक्षण अधिनियमानुसार अशा हत्तींना नैसर्गिक वातावरणात ठेवणे गरजेचे असल्याने, वनविभागाने न्यायालयीन आदेशाच्या आधारे महादेवीला गुजरातमधील वनतारा या प्रकल्पात हलवले. वनतारा प्रकल्प एक हत्ती पुनर्वसन केंद्र असून, ते रिलायन्स उद्योग समूहाच्या सीएसआर अंतर्गत चालवले जाते. हाच संबंध जैन समाजाच्या रोषाचे मूळ आहे.
समाजात संतापाची लाट
महादेवीच्या हलवण्यानंतर नांदणीपासून इचलकरंजी, कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील जैन बांधवांमध्ये तीव्र भावना उमटल्या. अनेक ठिकाणी धर्मसभा घेऊन ती वनतारा प्रकल्पातून परत आणावी, अशी मागणी करण्यात आली.
महादेवी ही केवळ एक प्राणी नाही, ती आमच्या धर्मपरंपरेचा भाग होती. ती हिरावून नेणं म्हणजे आमच्या श्रद्धेचा अपमान आहे, असे वक्तव्य
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले आहे.
जिओ बहिष्कार मोहिमेचा प्रारंभ
या पार्श्वभूमीवर, समाजाने जिओ नेटवर्कविरोधात व्यापक बहिष्काराची घोषणा केली आहे. अनेकांनी आपल्या – दुकानांवर आणि घरांवर
‘ बॉयकॉट जिओ – महादेवी बचाव ‘ अशा फलक लावले आहेत. काही ठिकाणी तर दुकानदारांनी ग्राहकांना विनंती केली की, महादेवीच्या समर्थनार्थ कृपया जिओ वापरू नका. याला सर्वच धर्मियांतून पाठबळ मिळत आहे.
अंबानीच्या निषेधाचा ठराव मंजूर
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सिमा भागातील अनेक ग्रामपंचायती ने अंबानीचा निषेध व्यक्त करत महादेवीला पुन्हा परत आणण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असा ठराव मंजूर केला आहे. एका दिवसात शेकडो ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून सरकारकडे पाठविला आहे.