
Devendra Fadnavis
मुंबई , दि. १८: गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉटेल ललित येथे आयोजित राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी उपस्थित होते.
तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या अमेरिका आणि भारतातील भागीदारी ही २१ व्या शतकातील अत्यंत महत्वपूर्ण भागीदारीपैकी एक आहे. या भागीदारीचा पुढील टप्पा हा धोरणात्मक आणि अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग वाढविण्याचा आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्र हा केंद्रस्थानी असणार आहे. हे दशक भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे आहे.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने या परिषदेसाठी ‘भारत-अमेरिका सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची पुनर्रचना’ हा अत्यंत महत्वाचा विषय घेतला आहे. ही परिषद भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूक, संशोधन, निर्माण आणि विकास यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र ही ६६० बिलियन डॉलर अर्थव्यवस्था असून मागील सात वर्षांपासून १०.२ टक्के दराने विकास करीत आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या ही २७ वर्ष वयापर्यंत आहे. जगाच्या दृष्टीने विचार केला, तर महाराष्ट्र ही जगातील पहिल्या २० देशांमधील अर्थव्यवस्था आहे. भारत हा जगामध्ये सर्वात तरुण देश आहे आणि या तरुण देशांमध्ये महाराष्ट्र हे तरुणाईचे आकर्षण आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे. उत्पादन क्षेत्रापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांचा वाढता राज्याच्या सहभाग अर्थव्यवस्थेमध्ये आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलत जाणारे तंत्रज्ञान हे भारत आणि अमेरिकेतील भागीदारीला बदलाचे स्वरूप देत आहे. अमेरिकेमध्ये नवनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास आणि जागतिक उद्योगांच्या विकासामध्ये अग्रेसर होण्याची क्षमता आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि अमेरिका जागतिक क्षमता केंद्र विकसित करणे, नवीन डाटा सेंटर निर्माण करणे यामध्ये सहकार्यातून भरारी घेऊ शकतात. तसेच नवीन जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावरही भर देऊ शकतात.
वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक क्षमता भारतामध्ये अधिक मजबुतीने पुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये भारत हे स्केल इंजिन तर अमेरिका इनोव्हेशन इंजिन आहे. या दोन्हींच्या एकत्रीकरणातून आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी झेप महाराष्ट्राच्या मदतीने घेतली जाऊ शकते.
महाराष्ट्र हे १६५ एकर क्षेत्रावर नवी मुंबई परिसरात मेडिसिटी विकसित करीत आहे. जागतिक दर्जाची अद्ययावत रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येत आहे. यासोबतच डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये मुंबई आणि नवी मुंबई परिसर विकसित होत आहे. भारताच्या एकूण डिजिटल पायाभूत सुविधांपैकी ६५ टक्के सुविधा या महाराष्ट्रामध्ये आहेत. संपूर्ण डिजिटल परिसंस्था राज्यामध्ये विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांना महाराष्ट्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या संपूर्ण विकासाच्या बळावर भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीवर विश्वसनीय जागतिक पुरवठा साखळी बनविणे शक्य आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर म्हणाले, भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ आहेत. भविष्यातील आव्हानांचा विचार करता दोन्ही देशातील भागीदारी महत्वाचे ठरणार आहे. पुढील काळात दोन्ही देशांना आर्थिक संबंध वाढविण्यार भर द्यावा लागणार आहे.
अमेरिकेचा दूतावास प्रत्येकासाठी सदैव उघडे आहे. मुंबईतील कौन्सिलेट्स जगभरातील बहुतांश दूतावासांपेक्षा मोठे आहे. जगात इतर कोणतेही दोन देश अमेरिका आणि भारतासारखे जागतिक आर्थिक वाढीला गती देण्यासाठी सक्षम स्थितीत नाहीत. त्यामुळे दोन्ही देश भागीदारीतून हे कार्य करू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर विश्वास आहे आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून या संबंधांमध्ये मोठे योगदान दिले आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या अवघ्या काही आठवड्यांतच, त्यांनी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका पुढाकाराची सुरुवात केली, ज्याने या संबंधांमध्ये कायापालट घडवून आणला आहे, असेही राजदूत गोर म्हणाले.
यावेळी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, उत्तर प्रदेश चे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो-अमेरिकन चैंबर ऑफ कॉमर्स च्या पश्चिम भारत परिषदेचे क्षेत्रीय अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे, दक्षिण क्षेत्राचे अध्यक्ष प्रभू बाला यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमादरम्यान इंडो अमेरिकन कॉमर्स ऑफ चेंबरच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रादेशिक अध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूकदार उपस्थित होते.