तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार
मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची (FDA) धडक कारवाई सध्या चर्चेत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये FDA च्या पथकांकडून हॉटेल, डेअरी, दुकाने आणि इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. भेसळयुक्त माल आढळल्यास कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरही परवाना निलंबनासारखी कारवाई केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDA च्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक असून, सध्या अशी कारवाई सुरू असल्याचा आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यापुढेही FDA ची धडक कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती मुंढे यांनी दिली.
दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. गंभीर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिल्याची माहिती आहे.
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कायदेशीर त्रुटी राहू नयेत, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन विशेष कायदेशीर पथक स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, FDA च्या कारवाईची व्याप्ती केवळ खाद्यपदार्थ विक्रेते किंवा आस्थापनांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईमुळे भेसळ आणि खाद्यसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाईचा वेग कायम राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.



