Maharashtra Monsoon Return Update (फोटो सौजन्य-X)
‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने दमदार पुनरागमन केलं. खालापूर, कर्जत, खोपोली, रसायनी आणि माथेरान परिसरात जोरदार पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांचा मोठा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.राज्यातील अनेक भागांत पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस झाला, तर शेतकरी आणि जनावरांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो.
सांगलीच्या जत तालुक्यातील दरी बडची येथे मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे आठवडी बाजारात पाणीच पाणी झालं. पाण्याच्या लाटेत बाजारातील भाजीपाला वाहून गेल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तासगाव तालुक्यातील सावळजमध्येही जोरदार पाऊस झाला.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. आठवडी बाजारातील व्यापारी आणि ग्राहकांची यामुळे धावपळ उडाली. काही व्यापाऱ्यांचा भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झालं. दुसरीकडे, पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना नवसंजीवनी मिळावी यासाठी शेतकऱ्यांना आता आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






