
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात शीतलहर! पारा १३ अंशावर, (फोटो सौजन्य-X)
Maharashra Weather Update News Marathi: देशात थंडीचा कडाका वाढला असून या थंडीचा परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रातही दिसण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील थंडीचा कडाका तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच पुढील 48 तासांत थंडीची ही लाट अधिक तीव्र होणार आहे . यामध्ये पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे. मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट आली असून , नाशिक जिल्ह्यात मंगळवारी किमान तापमान 10.3 अंशांवर होतं तर महाबळेश्वरमध्ये हा आकडा 12 अंशांवर होता. ज्यामुळं नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरत आहे.
गेल्या आठवडाभरापासून गायब झालेली थंडी रविवारपासून (३० नोव्हेंबर) पुन्हा वाढली. तापमान वाढल्यामुळे अमरावती जिल्ह्यात उकाडा देखील बाढला होता. पण आता पुन्हा थंडीचा कडाका सुरू झाला आहे. रविवारी शहराचे तापमान १४ अंश सेल्सिअस होते, ते १ डिसेंबरला रात्री थेट ३ अंशांनी घसरून ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे.
अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात थंडीच्या लाटेने आपला प्रभाव दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. बंगालच्या उपसागरात कमी दावाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण होऊन रात्रीचे तापमान ९ अंशांवरून थेट १७ अंशांवर गेले होते, ज्यामुळे थंडी गायब झाली होती. मंगळवारी दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान १३ अंश सेल्सिअस होते. बुधवारी दिवसाचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढेल, तर रात्रीचे तापमान एक अंश सेल्सिअसने कमी होईल. ही प्रक्रिया रविवार ७ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर, सोमवारपासून दिवसाचे तापमान वाढेल, तर रात्रीचे तापमानही एक अंश सेल्सिअसने वाढेल. बुधवारी १० डिसेंबरला दिवसाचे तापमान कमाल ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे गुरुवारी ३१ अंश सेल्सिअस राहील. तथापि, रात्रीचे तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
उत्तरेकडील थंड वारे सक्रिय: थंडीची लाट गायब होण्यामागे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होते. परंतु, आता हे वातावरण निकडून जिल्ह्यात कोरडे हवामान तयार झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. या काळात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पारा ३ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. आठवडाभर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे थंडीचा कडाका अजून आठवडाभर तरी कायम राहील, असा अंदाज आहे.
२५ नोव्हेंबर १७ अंश
२६ नोव्हेंबर १६ अंश
२७नोव्हेंबर १६ अंश
२८ नोवेंबर १४ अंश
२९ नोव्हेंबर १३ अंश
३० नोव्हेंबर १४ अंश