तासगांव/ मिलिंद पोळ: गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. आघाडी आणि युत्यांचे जांगडगुत्ते पाहून सामान्य माणसाबरोबरच राजकीय विश्लेषक ही बुचकळ्यात पडत आहेत. नेमकं कोण कोणाचे विरोधकांनी कोण कोणाचे समर्थक हे खुद्द कार्यकर्त्यांनाही समजेनासे झाले आहे. विचार, निष्ठा वैचारिक तत्वे व मूल्ये राज्यातील नेते मंडळींनी केव्हाची बासनात गुंडाळून ठेवली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी व पदासाठी नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये ही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच दोन-तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी कमळ चिन्हाचा घरोघरी जाऊन प्रचार केला. तसेच गेल्या पाच निवडणुकांमध्ये घड्याळाला विरोध केला त्यांच्यावरच आता मात्र राजकीय अपरिहार्यता म्हणून घड्याळाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. तर ज्यांनी सलग पाच विधानसभा निवडणुकीत घड्याळाचा प्रचार केला त्यांच्यावर तुतारीचा प्रचार करण्याची वेळ आली आहे.
राज्यातील महायुतीच्या जागा वाटपामध्ये तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची जागा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीला गेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार व त्यांचे सुपुत्र यांना ही जागा राष्ट्रवादीकडे जाते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत डेरे दाखल होण्याची तयारी केली आहे. काहीही झालं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचीच असा दृढनिश्चय इच्छुकांनी केला असल्यामुळे प्रसंगी भाजपची साथ सोडून ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घ्यायला तयार झाले आहेत. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कवठेमंहाकाळ तालुक्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली होती. यावेळी प्रचारात त्यांनी भाजपच्या माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सडकून टीकाही केली होती. दरम्यानच्या काळात राजकीय पुलाखालून बरच पाणी गतीने वाहिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यापूर्वीचे राजकीय मतभेद बाजूला सारत कवठेमहांकाळचे नेते माजी खासदार संजय पाटील यांच्याबरोबर जाण्याचे संकेत मिळत आहेत. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असं अनेकदा ऐकलं वाचलं ही आहे. त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय तासगाव कवठेमहांकाळच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून भाजपकडून तयारी करत आहेत. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार सुमन पाटील व राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचीही तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या दोन प्रबळ दावेदरांबरोबरच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्याच अनुषंगाने तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. लोकसभेला माजी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात उघडपणे आघाडी उघडलेले अजितराव घोरपडे आगामी विधानसभा निवडणुकीत संजय पाटील व त्यांच्या सुपुत्राला साथ देणार का? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तसेच गेल्या सात विधानसभा निवडणुकीत स्व. आर. आर. पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची या मतदारसंघावर एक हाती असणारी पकड अबाधित राहणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये अतिशय विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या पाच विधानसभा निवडणुकीत आर आर पाटील गटाकडून ज्या घड्याळ चिन्हाचा प्रचार केला गेला होता. आज त्याच घड्याळ चिन्हाला विरोध करण्याची वेळ आर आर पाटील यांच्या गटावर आली आहे. तर तशीच परिस्थिती माजी खासदार संजय पाटील यांच्या गटावर आली आहे. गेल्या पाच विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाला विरोध करणारे आज ते चिन्ह घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये दोन्हीही राजकीय प्रस्थापितांवर अनोखी राजकीय अपरिहार्यता निर्माण झाली आहे. येणारी विधानसभा निवडणूक अतिशय रोमांचकारी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Title: Mahayuti seat sharing tasgaon kavthemahakal seat goes to ncp ajit pawar