तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत (File Photo : Rain)
तासगाव : सांगलीच्या तासगाव तालुक्याचा पूर्व भागातील डोंगरसोनी आणि सावळज परिसराला सोमवारी दुपारनंतर तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाने डोंगरसोनी भागात जमिनीचे बांध फुटून ओढ्या-नाल्यांना पूर आले. शेतात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळाले.
सोमवारी दुपारच्या दरम्यान डोंगरसोनी आणि सावळज भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे दोन तास बरसत होता. डोंगरसोनी गावातील निकम मळ्यातील ओढापात्रातील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली होती. गावातील अनेक मळ्यातील द्राक्षबागांमध्ये पाणी साचले होते. काही द्राक्षबागेतील बांध फुटून गेलेले आहेत. डोंगरसोनी, सावळज अंजनी, वडगाव, नागेवाडीसह परिसरातील शेतात मुसळधार पावसामुळे द्राक्षबागा पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मुसळधार अशा पावसामुळे अंजनी तलावाच्या पाण्यामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे.
येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
आता येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, 11 जून रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : पलूस तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्यातून काढावा लागतोय मार्ग
मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १३ ते १९ जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इस्त्रो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
हेदेखील वाचा : Rain Update : मराठवाड्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार; नांदेड, हिंगोलीत तर…