रोहित पाटलांचा सरकारवर थेट हल्लाबोल
तासगाव: अवकाळी पावसाने व महापुराने शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पेरणीपासून ते हंगामापर्यंत केलेला प्रचंड श्रम एका रात्रीत वाहून गेला. शेतकऱ्यांच्या घराघरांत हताशा, दुःख आणि उपासमार पसरली आहे. अशा वेळी सरकारने तातडीचा दिलासा द्यायला हवा होता; मात्र ते नेतेपदाच्या राजकारणात, टीका-टिप्पणीत व इशारा सभा घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत आमदार रोहित पाटील यांनी आज तासगाव तहसीलसमोर ठाम आवाजात प्रश्न केला – “शेतकरी जगण्यासाठी झगडतोय, त्याला दिलासा द्यायच्या ऐवजी इशारा सभा का घेताय?” राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने आयोजित या लाक्षणिक उपोषणादरम्यान आमदार पाटील यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काय म्हणाले रोहित पाटील?
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले,
“आज शेतकऱ्यांची लेकरं उपाशी आहेत. लोक त्रस्त आहेत. पण सरकारमधील नेते विरोधकांवर घसरट पातळीवर जाऊन टीका करण्यात मश्गूल आहेत. अशा टाळ्यांच्या गजरात सभा होत राहतील; पण शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळोख मात्र वाढतच जाईल.”
त्यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट बोट ठेवत टीका केली.पालकमंत्र्यांनी अद्याप अतिवृष्टीग्रस्त भागाची फिरस्ती केलेली नाही. शेतकऱ्यांच्या जगण्याच्या लढ्याकडे सरकारने पाठ फिरवली आहे. मात्र विरोधकांना इशारा देण्यात मात्र त्यांना रस आहे. सरकारने लोकहिताचे मुद्दे विसरून टीकेची नाटके रंगवली आहेत.
शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?
तात्काळ मदत जाहीर करावी
“आज शेतकऱ्याच्या खिशात बी-बियाणे आणायला पैसे नाहीत. तोंडावर दिवाळी आहे, लेकरांना गोडधोड खायला मिळेल का हा प्रश्न आहे. शासनाने निकष न लावता तातडीची मदत केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्याच्या खिशातूनच पैसे काढून त्यालाच मदत करणे ही तर चेष्टा आहे.”
सरकार शेतकऱ्यांना गंभीरपणे घेत नसल्याचे सांगत त्यांनी इशारा दिला जनतेच्या अश्रूंना आणि शेतकऱ्यांच्या हुंदक्यांना उत्तर द्यायला सरकार अपयशी ठरत असेल, तर येत्या निवडणुकांत जनता जागा दाखवून देईल.”
जिल्हा नियोजन निधी वाटपात अन्याय
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरूनही पाटील यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. “विरोधी आमदार असल्यामुळे निधीच्या वाटपात आमच्यावर अन्याय केला जातो. समान वाटप व्हायला हवे, लोकांची कामे होण्यासाठी निधी दिला गेला पाहिजे,” अशी अपेक्षा रोहीत पाटील यांनी स्पष्टपणे मांडली. दरम्यान या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. सरकारविरोधी घोषणांनी वातावरण दणाणले. शेतकऱ्यांच्या वेदना, आक्रोश व अपेक्षा यांना आवाज देणारे हे उपोषण जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रतीक ठरले. तासगावातील या लाक्षणिक उपोषणातून आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वेदना व प्रश्न सरकारसमोर ठामपणे मांडले आणि तातडीच्या मदतीची मागणी करत सरकारला थेट इशारा दिला.
पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती
या वेळी माजी आमदार सुमन ताई पाटील, सांगली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शितल हाक्के, अभिजीत पाटील, रवींद्र पाटील यांसह सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, सांगली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, हणमंत आप्पा देसाई, सावळजचे माजी सरपंच नितीन तारळेकर, विनोद कोळी तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.