एमआयटी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथील संशोधकांनी पुण्यातील ड्रॅगनफ्लाय (चतुर) प्रजातींच्या संख्येतील बदलांचे विश्लेषण करणारा अभ्यास सादर केला आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये असलेल्या आठ प्रजाती आता दिसत नसल्याने त्या नामशेष झाल्याची शक्यता आहे. अनियोजित शहरीकरण, पाण्याचे वाढलेले प्रदूषण आणि हवामान बदल ही यामागील संभाव्य कारणे आहेत. तसेच, सत्तावीस नव्या प्रजातींची नोंद करण्यात आली असून, हौशी नागरिक आणि जैवविविधतेबाबत वाढलेल्या जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे.
या अभ्यासात पश्चिम घाटातील पाच स्थानिक प्रजाती आढळून आल्या, त्यामुळे पुणे हे ओडोनेट (ड्रॅगनफ्लाय आणि डॅम्सेलफ्लाय) अभ्यासासाठी महत्त्वाचे ठिकाण मानले गेले. जवळपास दोन शतकांच्या कालावधीत प्रजातींची वाढ आणि घट यासंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डॉ. पंकज कोपर्डे यांच्या नेतृत्वाखाली अर्जुष पायरा आणि अमेय देशपांडे यांनी हे संशोधन केले. 2019 ते 2022 दरम्यान पुण्यातील 52 ठिकाणी डेटा गोळा करण्यात आला, तसेच 19व्या शतकातील 25 प्रकाशित लेख आणि सिटीझन सायन्स डेटाचा आढावा घेतला गेला.
हा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रॉपिकल इन्सेक्ट सायन्स’मध्ये (स्प्रिंगर नेचर) प्रकाशित करण्यात आला आहे. “ड्रॅगनफ्लाय हे अत्यंत महत्त्वाचे कीटक शिकारी असून, ते शहरी भागातील डास आणि अन्य कीटकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात. जंगलातील परिसंस्थेमध्ये वाघ जशी महत्त्वाची भूमिका बजावतो, तसेच ड्रॅगनफ्लाय पर्यावरणीय समतोल राखण्यास उपयुक्त ठरतात. त्यांच्या संख्येचे निरीक्षण करणे पर्यावरणाच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक आहे,” असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. पंकज कोपर्डे यांनी सांगितले. ऐतिहासिक तुलनेत आज संशोधकांना प्रगत डेटा संकलन तंत्रे आणि नागरिक विज्ञान उपक्रमांचा लाभ मिळतो, त्यामुळे जैवविविधतेचे बदल अधिक स्पष्टपणे समजतात.
वारजे, वेताळ टेकडी आणि पाषाण तलाव ही पुण्यात जैवविविधतेसाठी महत्त्वाची ठिकाणे असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यावर आधारित, MIT-WPU येथील संशोधक मुळा नदीकिनाऱ्यालगत झालेल्या शहरीकरणाचा ड्रॅगनफ्लायवर होणारा परिणाम अभ्यासत आहेत. भविष्यात जैवविविधतेतील बदल निरीक्षणासाठी दीर्घकालीन प्रकल्प हाती घेतले जातील. “डोंगर, गवताळ प्रदेश, नद्या आणि तलाव यांसारख्या शहरी हरित आणि निळ्या परिसंस्थांचे संवर्धन प्राधान्याने करणे आवश्यक आहे. वेगवान शहरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत विकास नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे या अभ्यासाचे सहसंशोधक अर्जुष पायरा म्हणाले.
हा अभ्यास भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने राबवला जात असून, जैवविविधतेतील बदल समजून घेण्यासाठी भविष्यात अधिक संशोधन करण्यास प्रेरणा मिळेल.