File Photo : Shirval Fire
शिरवळ : शिरवळ परिसरातील भंगार गोडाऊन येथे सातत्याने आगीच्या घटना घडताना दिसत आहे. या आगींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असून, परिसरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक, थर्माकोल व इतर केमिकलयुक्त पदार्थ जळल्यामुळे हवा विषारी होत आहे, ज्याचा थेट फटका लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना बसत आहे.
दरमहिन्याला कोणत्या ना कोणत्या भंगार गोडाऊनला आग लागते. काहीवेळा ही आग लहान प्रमाणात असते, तर काहीवेळा ती आटोक्यात येण्याआधीच मोठ्या प्रमाणावर पसरते. त्यामुळे शिरवळमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीमुळे स्थानिक पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. नियमित आगींमुळे MPCB आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या आगी नैसर्गिकरित्या लागत आहेत की, हेतूपुरस्सर कोणी त्यामागे आहे, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भंगार व्यवसायिकांकडे आग प्रतिबंधक उपाययोजना आहेत का? आणि त्या कार्यान्वित केल्या जात आहेत का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.
नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण
सततच्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, “आमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि दमा-श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना या धुरामुळे खूप त्रास होतो. आम्हाला शुद्ध हवा श्वासोच्छवासासाठी मिळायलाच हवी, पण या आगीमुळे वातावरण दुषित होत आहे.”
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाची जबाबदारी
नागरिकांनी मागणी केली आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. भंगार व्यवसायिकांसाठी काही नियम आणि आगीविषयी खबरदारी घेणे बंधनकारक करावे.
काय आहेत नागरिकांच्या मागणी?
1. आग प्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक कराव्यात.
2. भंगार गोडाऊनमधील साठवणुकीचे नियम कडक करावेत.
3. व्यवसायिकांनी स्वतःची फायर सेफ्टी यंत्रणा उभारणे अनिवार्य करावे.
4. आगीच्या घटनांमध्ये ज्या गोडाऊन मालकांचा निष्काळजीपणा सिद्ध होईल, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
5. MPCB आणि स्थानिक प्रशासनाने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात.