
आळेखिंडीत ३ किमी वाहनांच्या रांगा; पुणे-नाशिक महामार्गावर प्रवाशांचा संताप अनावर
आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली असून, शनिवारी आळेखिंड परिसरात तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.
रखडलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावर पुन्हा एकदा ‘महाजाम’ची परिस्थिती निर्माण झाली. सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ती वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशेची वाहतूक एकाच बाजूच्या अरुंद लेनमधून सुरू आहे. शनिवार असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची, खासगी वाहनांची, मालवाहू ट्रकांची आणि एसटी बसांची मोठी गर्दी महामार्गावर उसळली. वाहनांचा ताण वाढताच आळेखिंड परिसर अक्षरशः ठप्प झाला. वाहनांच्या रांगा इतक्या वाढल्या की अनेक ठिकाणी चालकांनी इंजिन बंद करून गाड्यांतच थांबण्याचा पर्याय निवडला.
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा ! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा
उन्हाच्या तीव्र झळा आणि वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या कोंडीत सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी भीषण होती की, रुग्णवाहिकांनाही वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहनचालकांनी बाजू देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अरुंद झालेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका मिनिटोमिनिट अडकून पडत होती. आपत्कालीन सेवांची अशी झालेली अवस्था पाहून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.
पोलिसांचा बंदोबस्त अपुरा
इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झालेली असतानाही आळेखिंड परिसरात महामार्ग पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त दिसून आला नाही. पोलिसांची अनुपस्थिती पाहून काही बेशिस्त वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घुसवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आधीच अस्ताव्यस्त झालेली वाहतूक आणखी कोलमडली. किरकोळ धक्काबुक्की, वादावादी आणि हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वाहनचालकांकडून तीव्र नाराजी
कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन तासांपासून गाडी इंचभरही पुढे सरकत नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, सावली नाही आणि उन्हामुळे गाडीत बसणंही कठीण झालं आहे, अशी व्यथा एका प्रवाशाने व्यक्त केली.