विधीमंडळातील रमीच्या डावावर कृषीमंत्री कोकाटे काय म्हणाले? (फोटो सौजन्य-X)
Manikrao Kokate Statement on Rummy Video News in Marathi : विधानसभेच्या अधिवेशनानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सभागृहात लक्षवेधी सुरू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते (ऑनलाइन रमी) खेळताना दिसत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन कोकाटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच विरोधांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले असते.
दरम्यान, कोकाटे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत कोकाटे राजीनामा देतील का? याबद्दल तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी राजीनामा दिलेला नाही. तसा विचारही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच सभागृहात कथित ऑनलाइन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, ““मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला.”
माणिकराव कोकाटे म्हणाले, “हा छोटा विषय आहे. ऑनलाईन रम्मी हा काय प्रकार आहे माहिती आहे का ? अकाउंट, बँक कनेक्ट करावे लागते, माझे कुठलेही नंबर नाही, बँक अकाउंट कनेक्ट नाही. आजतागायत मी राम्मी खेळलो नाही तरी माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे. यावेळी दुसऱ्याचा मोबाईल होता, अनेक गेम येत होते. पॉपअप गेम झाला, मला ते जमलं नाही. स्कीप ला 30 सेकंद लागतात माझा 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर कळलं असतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मी दोषी आढळलो तर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री किंवा मी थेट जाऊन राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईल. मी काहीही वेडेवाकडे केलेलं नाही. सगळ्यांचे सिडीआर चेक करावे . एकदा चौकशी करावी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष यांना पत्र व्यवहार करणार आहे, असं स्पष्टीकरण यावेळी माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
माणिकराव कोकाटे म्हणाले, ” राजीनामा देण्यासारखे घडलं काय? मी काही विनयभंग केला का ? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? मी मुख्यमंत्री यांना ब्रिफ केलेलं नाही. चौकशी झाली नाही त्यामुळे समज होणे साहजिकच आहे. रम्मी खेळलो नाही आणि खेळत नाही. मला नियमांची काळजी आहे. हा विषय अनावश्यक लावून धरले आहे. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत, असं यावेळी कोकाटेंनी सांगितले.