Sambhaji Bhide
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय गुरू मनोहर भिडे नामक विकृत गृहस्थ मागील अनेक वर्षांपासून मुलींचा द्वेष आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मागील वर्षापासून हत्यारे घेऊन वारीत येत आहे. वारकऱ्यांना, चोपदारांना धक्काबुक्की केली जाते. भिडे राज्यातील आणि देशातील धार्मिक आतंकवादी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. यामध्ये ते बोलत होते. जगताप म्हणाले, ‘सांगलीतील बागेतील महिलांनी आंबा खाल्ल्यास मुले जन्माला येतात, मुली जन्मत नाहीत असा जावईशोध भिडे देशाला सांगतात. राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने ते मनु संस्कृतीचा आचरण करण्यासाठी महिलांच्या विषयक चुकीची टिप्पणी करतात’.
तसेच महिलांनी जीन्स, टी शर्ट, टॉप घालू नये. ज्या घालतात त्या हिंदू धर्मातील नाहीत. हिंदू धर्माचे संस्कृती जतन करण्यास योग्य नाहीत, असे विधान करून त्यांनी समस्त मुलींचा, महिलांचा अपमान केला आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत’, असे ते म्हणाले.
दरम्यान, महिलांनी कोणते कपडे घालावे याबाबत विधाने करून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. भिडे राज्यातील आणि देशातील धार्मिक आतंकवादी आहे. राज्य सरकारला महिलांविषयी सन्मान वाटत असेल तर भिडेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असेही प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.