
राजकीय घडामोडींना वेग; पुण्यातील 'या' बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुण्यातील इतर पक्षांतील २२ माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा हाेती. ती शनिवारी खरी ठरली. मुंबईतील भाजप कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. पुण्यातील प्रमुख भाजप नेतेही यावेळी उपस्थित असल्याची माहिती दिली आहे. भाजपकडून हे पक्षप्रवेश दोन टप्प्यांत होणार आहेत. दुसऱ्या टप्प्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
या मेगा प्रवेशात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक विकास नाना दांगट, तसेच दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दाेन वेळा निवडणुक लढविलेले आणि माजी नगरसेवक सचिन दाेडके यांचा समावेश आहे. दाेडके यांच्या प्रवेशाला भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी विराेध दर्शविला हाेता. यावरून भाजपच्या बैठकीत वादही झाले हाेते. माजी नगरसेवक बाळा धनकवडे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, सतिश लाेंढे, खंडू लाेंढे, प्रतिभा चाेरगे, पायल तुपे आदींचाही भाजपाच्या गोटात सामील झालेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.
मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतरही वांजळे कुटुंब मनसेत सक्रिय होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सायली वांजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशांमुळे खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे मानले जात आहे. पुण्याच्या राजकारणात भाजपने टाकलेला हा डाव आगामी महापालिका निवडणुकीत किती प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आबा बागुल शिवसेनेत
महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापाैर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बागुल हे काॅंग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात हाेते. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखाेरी केली हाेती. त्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले हाेते. अपक्ष म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणुक लढविली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा हाेती. अनपेक्षितपणे त्यांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासाेबत त्यांचा मुलगा हेमंत बागुल देखील हाेते.