मराठा आंदोलनाची जोरदार तयारी; माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या मुंबईला जाणार
अकलूज : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे. त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐन गणपतीच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. कोणीही आडवे आले तरी, आम्ही २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या भरून मराठा बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयक धनाजी साखळकर व आण्णा शिदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
साखळकर म्हणाले, मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही संपूर्ण माळशिरस तालुक्याचा दौरा केला आहे. मराठा समाजामध्ये या आंदोलनाला जाण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला असून, तालुक्यातून सुमारे दीड हजार चारचाकी गाड्यांमधून सुमारे १५ हजार आंदोलक मुंबईला पोहोचणार आहेत, आम्ही आंदोलनासाठी कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. ज्यांना आर्थिक मदत द्यायची आहे, त्यांनी आंदोलनासाठी गाड्या द्याव्यात. आंदोलनापूर्वी आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाले तरी आंदोलनासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. आरक्षण मिळाले तर आम्ही गुलालाच्या गाड्या भरून मुंबईला जाऊ, गुलाल लावून त्यांचे आभार मानू.
प्रा. डॉ. मीनाक्षी जगदाळे म्हणाल्या, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजावर खूप प्रतिकूल परिणाम होत आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आमच्या समाजाची कुचंबणा होत आहे. यावेळी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी आता आपले भागले म्हणून चालणार नाही. त्यामुळे आंदोलनाला मोठ्या संख्येनी यावे.
या पत्रकार परिषदेला मराठा कोअर कमिटीतील भारत मगर, आशुभाऊ ढवळे, गणेश इंगळे, गणेश कदम, बापू भोळे, संकेत जाधव, सागर वरकड, ओंकार क्षीरसागर, शारदा चव्हाण, विशाल केचे पाटील, सयाजीराजे गायकवाड, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवलीतील आया बहिणी दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही. असंही जरांगेंनी म्हटले आहे.