
सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा...; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
मराठा भवनांची आवश्यकता
जरांगे म्हणाले, “मराठा बांधवांनी प्रत्येक भागात मराठा भवन उभारण्याची गरज असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेता येतील आणि त्यांना मदत करता येईल.”
जात पडताळणी प्रक्रियेवर संताप
जरांगे म्हणाले, जात पडताळणीसाठी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकार आणि काही अधिकारी मुद्दाम टाळाटाळ करीत आहेत. हैद्राबाद गॅझेट, सातारा, पुणे, औंध गॅझेटनुसार संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मराठा बांधवांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच शिंदे समिती पुन्हा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. अधिवेशनात सरकार काय निर्णय घेते ते पाहून आम्ही पुढील भूमिका ठरवणार असून, आम्हाला विश्वास आहे की पुन्हा आंदोलनाची वेळ सरकार आम्हाला येऊ देणार नाही, असं यावेळी जरांगे म्हणाले.
विविध समाजांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका
शेतकरी, मराठा, धनगर, बंजारा, कैकाडी, मुस्लिम, लिंगायत कोणत्याही समाजासाठी सरकारने आजवर ठोस पावले उचलली नाहीत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे विषय, योजना पुढे आणले जातात आणि लोकांची दिशाभूल केली जाते. सरकार म्हणते कर्जमाफी करू, मग बँका शेतकऱ्यांना नोटिसा का पाठवतात? प्रत्यक्ष आदेश काढा, म्हणजे शेतकरी वाचतील, असेही जरांगे म्हणाले. माझा घात करण्याचा कट रचला गेला आहे. मी सरकारची सुरक्षा नाकारली असून, माझे संरक्षण माझा मराठा बांधव करेल, असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.
धनंजय मुंडेंवर थेट आरोप
माझ्यावर घातपात करणाऱ्यांनी जबाबात म्हटले की, हा घातपात करण्यासाठी धनंजय मुंडेंनी यांनी सांगितले, मग जालना जिल्ह्याच्या एसपीने गृहमंत्रालयाकडून मुंडे यांना अटक करण्याची परवानगी का घेतली नाही? असा प्रश्न जारंगे यांनी उपस्थित केला. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपी आणि आमचीही नार्को टेस्ट करा, आम्ही तयार आहोत. पण कारवाई झाली नाही तर याचे परिणाम गंभीर होतील.” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी कालिदास वाडेकर, अशोक मांडेकर, भगवान मेदनकर, विजय खरमाटे, प्रवीण करपे, बाबा कौटकर, कैलास पारधी, अरुण कुऱ्हे, निलेश आंधळे, मोहन वाडेकर यासह असंख्य मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.