29 Aug 2025 04:25 PM (IST)
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. पण भर पावसात मराठा बांधवांचं आंदोलन सुरु आहे. सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांनी गर्दी केली आहे. मंत्रालयाबाहेरही आंदोलकांनी घोषणा केल्या.
29 Aug 2025 04:19 PM (IST)
मराठा आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. काही गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्रवास करताना अनावश्यक गर्दी टाळावी, केवळ गरज असल्यासच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केले आहे. आंदोलनामुळे होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांनी संयम बाळगावा, अशी विनंतीही प्रशासनाने केली आहे.
29 Aug 2025 03:35 PM (IST)
पाकिस्तान सध्या शतकातील सर्वात मोठ्या पुराच्या संकटाला सामोरे जात आहे. पंजाब, सियालकोट आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या प्रचंड पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत, तर १२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
29 Aug 2025 03:31 PM (IST)
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioPC ची घोषणा करण्यात आली. यासोबतच त्यांनी जिओ फ्रेम्स, रिया फॉर जिओ स्टार आणि व्हॉइस प्रिंटचीही घोषणा केली. आकाश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioPC च्या घोषणेसोबतच त्याच्या जबरदस्त वैशिष्ट्यांबद्दलही सांगितले.
29 Aug 2025 03:22 PM (IST)
बॉलीवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धमाल करणारा चित्रपट घेऊन आला आहे. साजिद नाडियाडवालाचा बहुप्रतिक्षित ‘बागी ४’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार आहे.
29 Aug 2025 03:14 PM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठा संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
29 Aug 2025 03:05 PM (IST)
कुरुंदवाड हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जिवंत उदाहरण मानले जाते. शहरातील गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गेल्या चार दशकांपासून धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम समाजबांधव शहरातील पाच मशिदीत दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा करतात. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या पिढीजात वारसांनी आजही तितक्याच श्रद्धेने अबाधित ठेवली आहे.
29 Aug 2025 02:37 PM (IST)
वाढत्या जागतिक अनिश्चितता, अमेरिकेने शुल्क वाढवलेले दर, भूराजकीय तणाव आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक ताण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने लवचिकता आणि ताकद दाखवली आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज – नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या प्रमुखांचे हे विधान आहे. दोन्ही एक्सचेंजच्या सीईओंचा असा विश्वास आहे की भारताची मजबूत आर्थिक स्थिती, धोरणात्मक सुधारणा आणि गुंतवणूकदारांच्या सक्रिय सहभागामुळे बाजाराला बाह्य धक्क्यांपासून संरक्षण मिळाले आहे. यामुळे भारताला एक आकर्षक आणि विश्वासार्ह गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून आणखी बळकटी मिळाली आहे.
29 Aug 2025 02:24 PM (IST)
मंडळाने लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे हार आणि अगदी क्रिकेट बॅटचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर भाविकांनी अमेरिकन डॉलर्सचा हार देखील राजाला दान केला आहे. संपूर्ण लालबाग नगरी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया” या घोषणांनी दुमदुमली आहे.
29 Aug 2025 02:05 PM (IST)
पहिल्या बिग बॉसच्या कर्णधार पदासाठी पात्र ठरलेले अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि कुचिका सदानंद यांच्यामध्ये कर्णधार पदासाठी लढत सुरू झाली आहे. कालच्या भागांमध्ये अभिषेक बजाज आणि बशीर अली या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. आता नव्या प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये हे भांडण आता हाणामारी पर्यंत पोहोचले आहे. अभिषेक बजाज हा प्रोमो मध्ये बशीर अलीने त्याला लाथ मारण्याचा आरोप करताना दिसत आहे.
29 Aug 2025 01:57 PM (IST)
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील साईनाथ कॉलनी परिसरात सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्यांच्याच मेहूण्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात योगेश मिश्रा आणि त्याचा धीरज मोठाले हे दोघे जखमी झाले आहेत.
29 Aug 2025 01:45 PM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून मोर्चा काढत मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांसह उपोषण सुरु केले आहे. मात्र जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसाच्या उपोषणाची परवानगी देण्यात आली आहे तर गुलाल उधळल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. याच परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जरांगे पाटील यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
29 Aug 2025 12:48 PM (IST)
एक भाकर समाजासाठी या ब्रीदवाक्य नुसार... नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येने रवाना झाले एक भाकर समाजासाठी यात ओबीसी, मुस्लिम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
29 Aug 2025 12:33 PM (IST)
“जरांगे नावाच्या काडीपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाह आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली, ते म्हणले मी सरकार उलथवून लावणार. सरकार उलथवण्यासाठी जरांगेंसह अजित पवारांचे आमदार आणि खासदार सामील आहेत,” असं हाके म्हणाले.
29 Aug 2025 12:25 PM (IST)
आमची सरकार म्हणून भूमिका सहकार्य करण्याची आहे. मुख्यमंत्री यांनी आंदोलकांना दुरावले नाही, जे नियमात बसते ते भूमिका मुख्यमंत्री घेतात, मराठा समाजाला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली, ती मागील 50 वर्षात कोणीच घेतली नाही, आमच्या सरकारने मराठा समाजाला न्याय दिला, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
29 Aug 2025 12:09 PM (IST)
गोरक्षकांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार ईद्रीस नायकवडी यांच्या विरोधात सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून निदर्शने करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आमदार खोत आणि आमदार नायकवडी यांनी बेताल वक्तव्य करत गोरक्षकांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.
29 Aug 2025 12:01 PM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु असून लाखो समर्थक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील खाऊगल्ली बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
29 Aug 2025 11:45 AM (IST)
हिंदू मुस्लीम ऐक्याची रिल शेअर केल्यामुळे रिलस्टार अथर्व सुदामे यांने रिल डिलीट केली होती. यानंतर डॅनी पंडितने देखील याच आशयावर रील शेअर केली. याबाबत रोहित पवार यांनी लिहिले आहे की, धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..! जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…! असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
29 Aug 2025 11:31 AM (IST)
"संघामध्ये काम करताना आम्ही स्वयंसेवक असतो. आमच्याकडे विशिष्ट जबाबदारी सोपवली जाते. ती आम्हाला हवी आहे का नको असा प्रश्नच नसतो. ते काम करु का नको असे नसते. संघाने काम सांगितल्यानंतर ते करावेच लागते. मी जरी 80 वर्षांचा झालो तरी संघाने सांगितले की जा जाऊन शाखा चालवा तर मला ते करावे लागणारच आहे. संघ जे काही सांगेल ते आम्ही करत असतो, त्यामुळे हे कधी माझ्या निवृत्तीबाबत किंवा इतर कोणाच्या निवृत्तीबाबत बोललो नाही. आम्ही तोपर्यंत काम करण्यासाठी तयार आहोत जो पर्यंत आम्हाला संघ काम करायला सांगितले आहे," अशी भूमिका मोहन भागवत यांनी घेतली आहे.
29 Aug 2025 11:17 AM (IST)
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात. आज त्यांची जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला आणि ते इतिहासातील सर्वोत्कृष्ट हॉकीपटूंमध्ये गणले जातात. त्यांच्या खेळातील कौशल्यामुळे भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके मिळाली. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरने दिलेली नोकरीची ऑफर त्यांनी नाकारली होती, हे त्यांच्या निडरपणाचे उदाहरण आहे.
29 Aug 2025 11:04 AM (IST)
साऊथ अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन अभिनीत ‘लोका: चॅप्टर १ चंद्रा’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने फक्त १ दिवसात २.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून नवा रेकॉर्ड बनवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ केरळमध्येच नव्हे तर देशभरात चांगली ओपनिंग केली आहे. मल्याळम चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, हा आकडा अलिकडच्या काळातील सर्वोत्तम मानला जात आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
29 Aug 2025 10:41 AM (IST)
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे. हा बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकीत अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. अमोल गायकवाड हा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
29 Aug 2025 10:37 AM (IST)
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने बहीण अर्पिता, मेहुणा आयुष शर्मा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासह काल मोठ्या थाटामाटात बाप्पाला निरोप दिला. यादरम्यान भाईजानने खूप डान्स केला. हा व्हिडिओ आता चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. सलमान खानच्या बाजूला प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्याची खास मैत्रीण सोनाक्षी देखील डान्स करताना दिसत आहेत. गणपती विसर्जनात संपूर्ण खान कुटुंब आनंदी दिसत आहे.
29 Aug 2025 10:20 AM (IST)
परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव विद्या विजय राठोड असे आहे. वाचा सविस्तर...
29 Aug 2025 10:08 AM (IST)
फरहाना जेव्हापासून सिक्रेट रूममध्ये गेली आहे, तेव्हापासून ‘बिग बॉस’ने तिला अनेक अधिकार दिले आहेत. तिच्यामुळे कॅप्टनसी टास्क देखील रंजक ठरणार आहे. त्याचा बदला घेण्यासाठी फरहानाने खेळ सुरू होण्यापूर्वीच बसीर अलीला कॅप्टनसीच्या शर्यतीतून बाहेर काढले. आता, ‘बिग बॉस’ फरहानाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी देणार आहे. खरं तर, आता या घरात एक नवीन अॅप रूम लाँच केला जाणार आहे. या रूममध्ये, स्पर्धकांना त्यांच्याशी संबंधित चांगल्या आणि वाईट ट्रेंडबद्दल सांगितले जाईल. अशा परिस्थितीत, ‘बिग बॉस’ फरहानाला एक मोठा निर्णय देईल.
29 Aug 2025 09:53 AM (IST)
मराठा समाजाला स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाचा अधिक सविस्तर
29 Aug 2025 09:52 AM (IST)
गेल्या काही दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान उत्तरखंडच्या रुद्रप्रयाग-चमोली येथे ढगफुटी झाली आहे. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून उत्तराखंड राज्यात निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर
29 Aug 2025 09:39 AM (IST)
भारतीय हवामान विभागाच्या अलर्टनुसार आज उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आज अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आज राजधानी दिल्लीत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये आज पावसापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र 31 ऑगस्ट पासून 2 ते 3 सप्टेंबरपर्यंत उत्तर प्रदेशात पावसाचा जोर वाढू शकतो.
Marathi Breaking news live updates- बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ चे सामने सुरू आहेत. काल या स्पर्धेचे राऊंड ऑफ १६ चे सामने पार पडले. यामध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आणि तीन सामने काल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी विजय मिळवून उप उपांत्य फेरीमध्ये एन्ट्री केली आहे. भारताची मिक्स जोडी तनिषा क्रिस्टो आणि ध्रुव कपिला यांनी कमालीची कामगिरी करून वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेले टंग आणि तसे या दोघांना पहिला राऊंड गमावल्यानंतर सलग दोन्ही राउंडमध्ये पराभूत करून उप उपांत्य फेरीतील प्रवेश केला आहे.