'मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही'; मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आजही हे आंदोलन होणार असून, मुंबईत याचे नियोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) यादीत आधीच ३५० पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक जमत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे.
मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत. त्या नियमानुसार हे आंदोलन झाले, तर आम्हाला काही अडचण नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही’.
तसेच ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे असल्याची मागणी आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सोडवला आहे. इतर कोणीही तो सोडवला नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत भरीव आर्थिक मदत देऊन उद्याोजक तयार करण्यात आले. विद्यार्थी व इतरांना मदत देण्यात आली. आमच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले असून ते आजवर टिकले आहे आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणि तरुणांना नोकऱ्यांसाठी होत आहे.