Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news live updates: हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला. एमिरेट्स एअरलाईन्सच्या बोईंग ७४७ कार्गो विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटून ते थेट समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ३.४० वाजता घडली. लँडिंगच्या वेळी विमानतळावरील एका वाहनाला विमानाची धडक बसली, त्यानंतर विमानाचा तोल गेल्याने ते रनवेवरून बाहेर जाऊन समुद्रात पडले. घटनेनंतर तात्काळ बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विमानातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान प्राधिकरणाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
20 Oct 2025 05:09 PM (IST)
एक मोठी बातमी समोर येत आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये एका ओला इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे सीईओ अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 Oct 2025 04:26 PM (IST)
बार्शी तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणानेे स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील खडकलगाव येथे ही घटना घडली आहे. सोमनाथ सुरेश रोंगे (वय ३५, रा. खडकलगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) असे मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयताचे वडील सुरेश रंगनाथ रोंगे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
20 Oct 2025 03:35 PM (IST)
IndusInd Bank Share Price Marathi News: कमकुवत निकाल असूनही, इंडसइंड बँकेचे शेअर्स आज वधारले. शेअर ₹७६५ च्या आसपास व्यवहार करताना दिसला, म्हणजेच २ टक्के वाढ. मुख्य उत्पन्नात मोठी घट आणि तरतुदींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे बँकेला तोटा सहन करावा लागला. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने शेअरला समान-वेट रेटिंग दिले आहे, तर नुवामाने शेअरला डाउनग्रेड केले आहे.
20 Oct 2025 03:25 PM (IST)
Thane News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता बूथ-स्तरीय एजंट (बीएलए) सक्षमीकरणावर आणि मतदार यादीतील कथित ‘बनावट’ मतदारांचा शोध घेण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेअंतर्गत, केवळ ठाणे शहरातच १५ ते २० हजार बीएलए नियुक्त करण्यात आले आहेत. हे एजंट मतदान केंद्रांवर सतर्क राहून संशयास्पद मतदारांवर लक्ष ठेवतील.
20 Oct 2025 03:19 PM (IST)
Karnataka Government Ban RSS: कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत पत्र लिहीत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. संघाला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबरला चित्तापुर येथे संघाचा एक कार्यक्रम होणार होता. त्याला तेथील स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र आता या प्रकरणात हायकोर्टाने सरकारला दणका दिला आहे.
20 Oct 2025 03:15 PM (IST)
RJD Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
20 Oct 2025 03:07 PM (IST)
8th Pay Commission Marathi News: केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली, परंतु त्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. शिवाय, आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे अद्याप अंतिम झालेली नाहीत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अलीकडेच राज्यसभेत माहिती दिली की सरकार या विषयावर सक्रियपणे काम करत आहे. ते म्हणाले, “८ व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबतची अधिसूचना योग्य वेळी जारी केली जाईल. आयोगाच्या स्थापनेनंतर, त्याचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त केले जातील.” केंद्र सरकारने असेही स्पष्ट केले आहे की ते राज्य सरकारांशी सक्रियपणे सल्लामसलत करत आहेत आणि आयोगाच्या स्थापनेबाबत लवकरच घोषणा अपेक्षित आहे.
20 Oct 2025 02:56 PM (IST)
Diwali Celebration in America : वॉशिंग्टन : आपली भारतीय संस्कृती आज जगभरातील लोकांना भूरळ घालत आहे. सध्या देशभारत दिवळाचा उत्सव साजरा केला जात आहे. पण आपल्या भारतताच नाही, चर परदेशातही दिवळाची धूम आजकाल पाहायला मिळते. परदेशी लोकही आनंदाने उत्साहने दिवाळी साजरी करतात. अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये धूमधडाक्यात दिवाळीचे सेलिब्रेशन करण्यात आले आहे.
20 Oct 2025 02:26 PM (IST)
RJD Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
20 Oct 2025 12:45 PM (IST)
WhatsApp चा मालक असलेली कंपनी मेटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम WhatsApp युजर्सवर होणार आहे. कंपनीने निर्णय घेतला आहे की, आता युजर्स थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर करू शकणार नाहीत. मेटाने हा नवीन निर्णय घेत सांगितलं आहे की, आता मेजेसिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे युजर्स WhatsApp वर केवळ मेटा AI असिस्टेंटचाच वापर करू शकणार आहेत. याशिवाय युजर्ससाठी इतर सर्व थर्ड-पार्टी AI चॅटबॉट्सचा वापर बॅन केला जाणार आहे.
20 Oct 2025 12:35 PM (IST)
बिग बॉस १९ मध्ये दिसलेली तान्या मित्तलने शो दरम्यान तिच्या आलिशान जीवनशैलीबद्दल अनेक विधाने केली आहेत. अलीकडेच सलमान खाननेही या विधानांवर भाष्य केले आणि तिला शोमधील सर्वात धूर्त खेळाडू म्हटले. आता, मालती चहरने पुन्हा एकदा तान्याचे खरे रंग घरातील सर्व सदस्यांसमोर उघड केले आहेत. आजच्या भागातून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मालती घरातील सदस्यांना तान्याबद्दल इतके मीम्स का बनवले जात आहेत हे स्पष्ट करते.
20 Oct 2025 12:25 PM (IST)
मुंबईतील लोखंडवाला येथील हॉप्स किचन अँड बारच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला दारू दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. १५ वर्षीय मुलगी आणि तिचा २१ वर्षीय मित्र दारू पिऊन गंभीर आजारी पडल्यानंतर आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
20 Oct 2025 12:05 PM (IST)
मध्य प्रदेशातील रतलाम येथे अल्प्राझोलम बनवणाऱ्या एका गुप्त प्रयोगशाळेचा एनसीबीने पर्दाफाश केला. या कारवाईत १३.७६२ किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले, ज्याची किंमत बेकायदेशीर बाजारात अंदाजे ३.४४ कोटी रुपये आहे. मोठ्या प्रमाणात रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे देखील जप्त करण्यात आली. दोन व्यक्तींना - एक बी.टी. पदवीधर आणि औषध कंपन्यांचा माजी ऑपरेटर, जो सध्या एनडीपीएस प्रकरणात जामिनावर आहे आणि एक बी.फार्म पदवीधर आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा माजी अधिकारी - अटक करण्यात आली आहे.
20 Oct 2025 11:55 AM (IST)
मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करत असतात. यावेळी देखील पंतप्रधान मोदींनी नेव्हीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. आयएनएस विक्रांतवर आपल्या शूर नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.
20 Oct 2025 11:45 AM (IST)
दिवाळीच्या निमित्ताने कामांसाठी बाहेरच्या राज्यामध्ये गेलेले बिहारी लोक परतत आहेत. यामुळे बिहारकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी पूर्णपणे भरल्या आहेत. या गर्दीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
कहाँ हैं अश्विनी वैष्णव?
कहाँ है आपका 12,000 ट्रेन ?
कहाँ है छठ-दिवाली में बिहारियों के लिए स्पेशल ट्रेन चलाने का वादा?
हाँ दो बिहारियों की आज मुंबई से बिहार आते वक्त ट्रेन से गिर कर मरने की खबर मिली है।
आपके जैसा रेल मंत्री ना देखा गया ना देखा जाएगा!pic.twitter.com/Jvuc3cw5nU
— Priyanka Bharti (@priyanka2bharti) October 19, 2025
20 Oct 2025 11:35 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले आहे की, माझ्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा पवित्र सण सर्वांचे जीवन आनंदाने, समृद्धीने आणि सौहार्दाने उजळून टाको, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। प्रकाश का यह पावन पर्व हर किसी के जीवन को सुख-समृद्धि और सौहार्द से आलोकित करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2025
20 Oct 2025 11:25 AM (IST)
'नजफगढचा नवाब' म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सहवागचा आज वाढदिवस. माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या सहवागने आपल्या खेळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्याने १९९९ ते २०१३ या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तो जगातील सर्वात विध्वंसक सलामीवीरांपैकी एक मानला जातो. त्याने उजव्या हाताने फलंदाजी केली आणि गोलंदाजीही केली. २० ऑक्टोबर १९७८ रोजी वीरेंद्र सहवागचा दिल्लीमध्ये जन्म झाला. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
20 Oct 2025 11:15 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या पुन्हा वाद झाला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना युद्ध थांबवण्यासाठी रशियाच्या अटी मान्य करण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी युक्रेनला लष्करी मदत बंद करण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. परंतु झेलेन्स्की यांनी रशियाच्या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार देत, युक्रेन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले असे म्हटले. यावरुन ट्रम्प आणि झेलेन्स्कींमध्ये जोरदार वाद झाला. ट्रम्प यांनी झेलेन्स्कींच्या नकाशे आराखडे देखील फेकून दिले.
20 Oct 2025 11:10 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नामांकन पत्रांची छाननी शनिवारी पूर्ण झाली आहे. भाजप नेते चिराग पासवान यांच्या एलजेपी आणि बसपा तसेच बंडखोर जेडीयू उमेदवारांचे नामांकन पत्र रद्द करण्यात आल्याची आहे. याशिवाय विविध जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या यादीनुसार, रात्री ९ वाजेपर्यंत एकूण ४६७ उमेदवारांचे नामांकन पत्र रद्द करण्यात आले.
20 Oct 2025 10:43 AM (IST)
पुण्यातील सदाशिव पेठेतील चव्हाण वाडा याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पाच वाहने दाखल होत आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. घटनास्थळी एक मजली वाडा व यामध्ये एकूण चार कुटुंबे राहात होती. सदर ठिकाणी छतावर आग लागल्याचे निदर्शनास येताच कुटुंबातील रहिवाशांनी अग्निशमन दलास पाचारण करीत वाड्याबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने वाड्यात आतमध्ये प्रवेश करून प्रथम कोणी अडकले नाही खाञी करीत तीन सिलेंडर बाहेर घेत आगीवर पाणी मारून सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणून कुलिंगचे काम सुरु ठेवत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला.
20 Oct 2025 10:42 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला कर आकारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर त्यांना मोठे कर भरावे लागतील असे ते म्हणाले. ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा वॉशिंग्टन रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की तेलाच्या उत्पन्नामुळे रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू ठेवत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दबाव वाढविण्याचे काम सुरू आहे.
20 Oct 2025 10:33 AM (IST)
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जवळजवळ सात महिन्यांत भारतासाठी पहिला सामना खेळला. पण त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती. रोहितने फक्त ८ धावा केल्या आणि कोहली शून्यावर बाद झाला. भारतीय चाहत्यांना या दिग्गज जोडीकडून खूप आशा होत्या, परंतु दोघेही लयीत नसल्याचे दिसून आले. या पराभवानंतरही, माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. पुढील दोन सामन्यांमध्ये त्यांना दमदार कामगिरीची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.
20 Oct 2025 10:24 AM (IST)
आज सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण आपल्या कुटुंबीयांना मित्र परिवाराला शुभेच्छा देत असतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठीस्टिकर्स शोधत आहात का? आता व्हाट्सअपवर तुम्ही मित्रांना, कुटुंबीयांना अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. सगळ्यात विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करण्याची देखील गरज नाही.
20 Oct 2025 10:15 AM (IST)
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
20 Oct 2025 10:05 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची बॅट चांगली कामगिरी करू शकली नाही. तो ८ चेंडूंत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
20 Oct 2025 10:00 AM (IST)
राज्यासह देशभर मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जरी मॉन्सूनचे ढग आता दूर गेले असले तरी, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान विभागाने 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा दिला आहे. नवरात्री नंतर सुरू होणारी दिवाळीही पावसाच्या सावटाखाली जाऊ शकते, असे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये अलीकडेच पावसामुळे मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे हाताला आलेले पिक वाहून गेले असून, त्यांचा मोठा आर्थिक फटका झाला आहे.
20 Oct 2025 09:55 AM (IST)
पुण्यातील वडगावशेरी परिसरात दिवाळीच्या तयारीदरम्यान हृदयद्रावक घटना घडली. आपल्या मंडळाच्या वतीने दिवाळीच्या आकाशकंदील बांधणी करत असलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्ती हा मंडळाचा अत्यंत उत्साही आणि कार्यतत्पर सदस्य असल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
20 Oct 2025 09:55 AM (IST)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये काल महिला विश्वचषकाचा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ सामना १९ ऑक्टोबर रोजी इंदूर येथे खेळवण्यात आला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ७ गडी गमावून २८८ धावा केल्या. भारताने २८४ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ४ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर इंग्लंडने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
20 Oct 2025 09:51 AM (IST)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू असतानाच नाशिकमध्ये राजकीय उलटे वारे वाहू लागले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक काही काळापासून नाराज असल्याची चर्चा होती आणि त्यांनी लवकरच भाजप सोडण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता त्यांनी पक्षाबाहेर न जाता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच माजी नगरसेवक युतीत सामील होणार आहेत.
20 Oct 2025 09:50 AM (IST)
“जगभरात अनेक अशा इमारती आहेत ज्या आपल्या विलक्षण आर्किटेक्चरमुळे प्रसिद्ध आहेत. या यादीत चीनमधील एक अद्भुत हॉटेलही समाविष्ट आहे, जे एका जुन्या खाणीत बांधले गेले आहे आणि त्याला “वॉटरफॉल हॉटेल” म्हणून ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया या अनोख्या हॉटेलची खासियत काय आहे आणि त्याला हे नाव का दिलं गेलं.
20 Oct 2025 09:45 AM (IST)
साऊथ स्टार ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर १” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट सातत्याने कमाई करत आहे. अलिकडेच “कांतारा चॅप्टर १” ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जो एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे. आता, हा चित्रपट भारतात ६०० कोटींच्या क्लबमध्ये वेगाने पोहोचत आहे. ऋषभ शेट्टीच्या “कांतारा चॅप्टर १” ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
20 Oct 2025 09:40 AM (IST)
धनत्रयोदशीपासून पाच दिवसांची दिवाळी सुरू होते. आज सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. हा दीर्घायुष्यासाठी आणि सौंदर्याच्या आकांक्षेचा दिवस प्रार्थना करण्याचा दिवस. श्रीकृष्णाची पूजा देखील केली जाते. कारण याच दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा पराभव केला होता. या दिवशी मृत्युदेवता यमराजाची पूजा केली जाते. यमराजासाठी दिवा देखील लावला जातो.
20 Oct 2025 09:35 AM (IST)
ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. अलिकडेच तिने जाहीर केले की ती कायमची भारतात परतली आहे आणि तिच्या पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तिच्या लोकप्रिय नृत्य गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने असंख्य गाण्यांमध्ये तिच्या सादरीकरणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, राखीने तमन्ना भाटियावर टीका केली, जी सध्या आयटम नंबर सादर करत आहे आणि कौतुकाची थाप मिळवत आहे. यामुळे राखीने अभिनेत्रीवर टीका केली आहे.
20 Oct 2025 09:15 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, भारताने जर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवली, तर त्यांना मोठ्या प्रमाणात आयात शुल्क भरावे लागेल. एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितले की भारत रशियन तेल खरेदी करणार नाही. पण जर तसे झाले नाही, तर भारताला मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागेल.”
ट्रम्प प्रशासनाचा असा दावा आहे की, रशियाकडून तेल खरेदी करणारे देश अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवत आहेत. त्यामुळे अमेरिका सातत्याने रशियाकडून ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर दबाव आणत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकेने भारतासह अनेक देशांना रशियन तेल खरेदी कमी करण्याचे किंवा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
20 Oct 2025 09:05 AM (IST)
दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण असून, गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज उच्चांक गाठला आहे. निफ्टी 50 निर्देशांकाने 52 आठवड्यांचा उच्चांक नोंदवला, तर सेन्सेक्समध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,900 अंकांची उसळी पाहायला मिळाली आहे. या वाढीमुळे बाजारात उत्साहाचं आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थैर्य, देशांतर्गत आर्थिक संकेत सुधारत असल्याचं चित्र आणि आयटी तसेच बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे ही तेजी कायम राहिल्याचं विश्लेषकांचे मत आहे.
20 Oct 2025 09:00 AM (IST)
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाला आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. रोमांचक अशा सामन्यात इंग्लंडने भारताचा केवळ ४ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत टीम इंडियाचा हा सलग तिसरा पराभव असून, उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग आता अधिक कठीण झाला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २८९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी चांगली लढत दिली, मात्र संघ ५० षटकांत २८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला.
20 Oct 2025 08:55 AM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मध्ये असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत. खासदार आणि पक्षनेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या विभागीय बैठकीत युतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी युती धर्म मित्र पक्षांकडून पाळला जात नसल्याची तक्रार केली. निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना पाठबळ देऊन आमचं नुकसान केलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
20 Oct 2025 08:50 AM (IST)
आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिला आहे.भाजपचे माजी परिवहन सभापती लक्ष्मण आंबोकर आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण येथे पार पडला.
20 Oct 2025 08:43 AM (IST)
पुण्यातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंददायी ठरणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनसचा निधी मंजूर करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना लवकरच या दोन्ही लाभांचा फायदा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पीएमपीएमएलसाठी एकूण ८४.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम तसेच महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि सवलतीच्या पाससाठी २० कोटींचा निधी समाविष्ट आहे. हा निधी शुक्रवारी पीएमपीएमएलच्या खात्यात जमा करण्यात आला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
20 Oct 2025 08:38 AM (IST)
पुणेकरांच्या प्रवासात सोयीची भर पडणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील मेट्रो प्रवाशांसाठी ‘वन पुणे कार्ड’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवासी आता ‘पुणे मेट्रो’, ‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो’ तसेच ‘पीएमपीएमएल’ बससेवा या तिन्ही मार्गांवर सहज प्रवास करू शकतील.
या कार्डच्या वापरामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणार असून, भाडे भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक होईल. ‘वन पुणे कार्ड’च्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एका एकत्रित प्रणालीत जोडल्या जात असल्याने पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद होणार आहे.
20 Oct 2025 08:36 AM (IST)
चिपळूण शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा पहिला गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रत्नागिरीतील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.