12 Sep 2025 01:10 PM (IST)
राजभवनामध्ये उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यासाठी माजी उपराष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले होते, ही एक स्थापित संवैधानिक परंपरा आहे. जगदीप धनखड यांनीही परंपरेचे पालन करत या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थिती लावली. धनखड यांच्यासोबत इतर अनेक नेते सामील झाले. समारंभादरम्यान, जगदीप धनखड इतर वरिष्ठ नेत्यांसह व्यासपीठावर बसलेले दिसले. त्यांच्या शेजारी आणखी एका ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थितीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले.
12 Sep 2025 01:04 PM (IST)
व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता, यात तुम्हाला एक व्यक्ती कैलास पर्वतापासून खूप दूर उभी असलेली दिसेल. कैलास पर्वत बर्फाच्या चादरीने झाकलेला आहे. यानंतर तो व्यक्ती हवेत आपला ड्रोन उडवतो जो गोळीच्या वेगाने पर्वताकडे जाऊ लागतो. फ्रेमच्या सुरुवातीलाच हे दृश्य आश्चर्यकारक आणि सुंदर दृश्यांनी भरलेले दिसून येते. यामध्ये तुम्हाला दिसेल की कधीकधी ड्रोन वेग वाढवतो तर कधीकधी हळू चालतो. पण शेवटी, ड्रोन पर्वताच्या जवळ पोहोचताच, एक मनमोहक आणि शांत दृश्य दिसू लागते जे सर्वांनाच खुश करते.
12 Sep 2025 12:45 PM (IST)
मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजित येवला दौरा रद्द केला असून आज ते लातूर दौऱ्यावर जाणार आहेत. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीत भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केली आहे. तर कराड यांची कुटुंबियाची भेट घेण्यासाठी ते आज रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाणार आहेत.
12 Sep 2025 12:35 PM (IST)
राहुरी तालुक्यात नगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रात्री उशिरा एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असताना, सकाळी पुन्हा झालेल्या अपघातात आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वारंवार होणाऱ्या या अपघातांनी संतप्त झालेले नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. त्यांनी राहुरी येथे नगर-मनमाड महामार्ग अडवून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही सहभाग घेऊन नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. नागरिकांचा संताप महामार्गाच्या खराब स्थितीमुळे असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
12 Sep 2025 12:25 PM (IST)
भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. सरन्यायाधीश गवई येथे देखील या समारंभाला उपस्थित होते.
12 Sep 2025 12:15 PM (IST)
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आरक्षण नको का असा सवाल केला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळत असताना ओबीसीतून आरक्षणाचा आग्रह का असा सवाल त्यांनी केला आहे.
12 Sep 2025 12:15 PM (IST)
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट आणि गण प्रारुप प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर होऊन लवकरच निवडणूक होईल, अशी शक्यता होती. मात्र, या शक्यतेला ब्रेक लागला आहे. सरकारच्या विरोधात आरक्षण सोडतीच्याआधीच नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
12 Sep 2025 12:05 PM (IST)
दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार असून, दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
12 Sep 2025 12:05 PM (IST)
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज, कंटेंट यांचा वापर करणं म्हणजे सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर न्यायालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, गुगल यांना नोटीससुद्धा बजावली आहे. त्याचप्रमाणे ऐश्वर्याने तिच्या तक्रारीत ज्या URL चा उल्लेख केला आहे, त्या 72 तासांच्या आत काढून टाकण्याचे, डिॲक्टिव्हेट करण्याचे आणि ब्लॉक करण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत.
12 Sep 2025 11:55 AM (IST)
सीपी राधाकृष्णन यांनी आज देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून हे पद जिंकले आहे.
12 Sep 2025 11:45 AM (IST)
दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर खिळे ठोकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामुळे महामार्गावर पंक्चर झालेल्या गाडींची रीघ लागली होती. अगदी एका गाडीचे चारही चाक पंक्चर झाली असल्याचे दिसून आले. संबंधित प्रकार हा खिळे ठोकण्याचा नसून रस्त्याच्या अंतर्गत भेगा, तडे बुजवण्याच्या कामानिमित्त नोजल्सद्वारे रसायन सोडण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. यानंतर कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Sep 2025 11:35 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, आज हेच मूर्ख लोक पोलिस आयुक्ताना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत; खुशाल करा अशी मागणी! हे लोक घाबरले आहेत! भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच ; ये डर अच्छा है! नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच!
12 Sep 2025 11:25 AM (IST)
नेपाळमधील जीवन हळूहळू सामान्य होत असताना आज सकाळी काठमांडू शहरात लष्कराचे जवान पहारा देत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारविरुद्ध निदर्शने सुरू असताना ९ सप्टेंबर रोजी नेपाळी पंतप्रधानांनी राजीनामा दिला. अराजकता पसरल्यानंतर आता वातावरण शांत होत आहे.
12 Sep 2025 11:05 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राशी संबंधित शौर्यवान घटनांमध्ये आग्राहून सुटका एक महत्त्वपूर्ण मोहिम आहे. मिर्झाराजे जयसिंगच्या आश्वासनावरून छत्रपती शिवराय हे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे आले होते, परंतु योग्य सन्मान न मिळाल्यामुळे औरंगजेबाला पाठ दाखवून शिवरायांनी दरबार सोडला. यामुळे अपमानित झालेल्या औरंगजेबाने छत्रपतींना कैद केले. यानंतर युक्तीने शिवरायांनी त्यांची आणि युवराज संभाजीराजेंची सुखरुप सुटका केली. सुरक्षेमुळे वेषांतर करुन महाराष्ट्र गाठला आणि राजगड येथे सुखरूप पोहोचले. आजच्या दिवशी 12 सप्टेंबर 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुखरुप पोहचले होते.
12 Sep 2025 10:56 AM (IST)
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आणि एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले. पत्रकार परिषदेत पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल विचारण्यात आले की हा सामना फिरकी गोलंदाजांमध्ये होईल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “आमच्या संघाचे सौंदर्य म्हणजे आमच्याकडे ५ फिरकी गोलंदाज आहेत आणि जेव्हा तुमच्याकडे असे फिरकी गोलंदाज असतात तेव्हा खेळपट्टीलाही काही फरक पडत नाही.
12 Sep 2025 10:44 AM (IST)
दिल्ली पोलिस दलातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींच्या पथकाने ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आयसिसशी संबंध असलेल्या आफताब आणि सूफियान या दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा कट होता. मात्र, त्यांच्या योजना उधळून लावत पोलिसांनी त्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरूनच ताब्यात घेतलं.
12 Sep 2025 10:37 AM (IST)
बिग बॉस १९ च्या नवीनतम भागात, बशीर अली आणि अभिषेक बजाजमध्ये भांडण झाले आणि नंतर आवाज दरबार देखील या भांडणात अडकला. या दरम्यान, बशीर आणि आवाज यांच्यातील वाद वाढतो आणि बशीर म्हणतो की आवाज त्याच्या मैत्रिणीच्या मागे लपतो. आवाज बशीरला सांगतो की त्याचा खेळ फक्त मुलींच्या मागे आहे. कधी तो नतालियासोबत राहतो, कधी फरहानासोबत तर कधी नेहलसोबत. बशीरला याचा राग येतो आणि तो आवाजाच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करतो.
12 Sep 2025 10:28 AM (IST)
लग्नाच्या पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तर पीडितेने असा आरोप केला आहे की तिचा पती म्हणजेच गौरव तांबे हा नपुंसक असून तिच्या सासऱ्याने ह्यामुळेच शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर सासूने आणि पतीने वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली होती. मुल हवं म्हणून सासऱ्या बरोबर शरिर संबंध ठेव असा दबाव सूनेवर पती आणि सासूकडून टाकला जात होता. 10 सप्टेंबर रोजी सासरे यांनी ओळखीचा धाक दाखवून रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या घरी घुसून जबरदस्ती शारीरिक सुखाची मागणी केली.
12 Sep 2025 10:19 AM (IST)
भारतीय हवामान विभागाने भंडारा जिल्ह्यासाठी ११ ते १४ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार या काळात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विजा पडण्याची आणि जोरदार वाऱ्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपदा व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बातमी सविस्तर वाचा...
12 Sep 2025 10:15 AM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
12 Sep 2025 10:10 AM (IST)
आशिया कप 2025 सुरु झाला आहे आणि आतापर्यत भारताचा पहिलाच सामना हा यूएईविरुद्ध झाला आहे. आशिया कपचे आतापर्यत तीन सामने यामध्ये दुबईमध्ये प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये सामन्याच्या वेळी प्रेक्षकांची गर्दी दिसली नाही. त्यामुळे आता भारताचा माजी खेळाडू याने स्टेडियममध्ये गर्दी नसल्याचे कारण स्पष्ट केले आहे. रविवारी आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे न विकण्याचे कारण माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे. बातमी सविस्तर वाचा...
12 Sep 2025 10:00 AM (IST)
Bandu Andekar News: नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या घरावर बुधवारी (१० सप्टेंबर) पुणे पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांना सोनं, चांदी, रोकड तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. झडती सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन गुरुवारी (दि. ११) पहाटे चार वाजेपर्यंत चालली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. आंदेकरने आपल्या घराच्या शंभर मीटर परिसरात तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
12 Sep 2025 09:55 AM (IST)
नेपाळमधील भ्रष्टाचाराविरुद्ध जनरल झेडने देशभर आंदोलने केली ज्याने संपूर्ण नेपाळच काय तर जग हादरलं. काळासोबतच या आंदोलनाने पुढे इतके मोठे रूप धारण केले की नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अनेक गाड्या जाळण्यात आल्या, दुकाने लुटण्यात आली आणि हा गोंधळ काही थांबण्याचा नावच घेत नव्हता. नेपाळमधील या घटनांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र नुकताच नेपाळमधील जनरल झेडचा एक नवीन आणि अनोखा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात ते रस्ते साफ करताना आणि लुटलेलं सर्व सामान परत करताना दिसून आले. जनरल झेडचे हे बदलेले रूप पाहून आता सर्वच अचंबित झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
12 Sep 2025 09:45 AM (IST)
आशिया कप २०२५ मध्ये बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये बांगलादेशचे ३ आणि हाँगकाँगचे २ खेळाडूंचा समावेश आहे. बांगलादेशकडून कर्णधार लिटन दासने शानदार अर्धशतक झळकावले. बांगलादेशच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो कर्णधार लिटन दास होता. त्याने ३९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५९ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १५१.२८ होता. तो सामन्यातील सर्वात मोठा सुपरस्टार होता. या खेळीमुळे बांगलादेश संघाला हाँगकाँगविरुद्ध सहज विजय मिळाला. तो सामनावीरही ठरला. फोटो सौजन्य - AsianCricketCouncil
12 Sep 2025 09:39 AM (IST)
अमेरिकेतील डलास शहरात भारतीय वंशाच्या व्यक्तीची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. चंद्र नागमल्लैया असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आरोपीने पत्नी आणि मुलासमोरच त्याचा कुऱ्हाडीने शीर धडावेगळं करत जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग मशीनच्या वापराबाबत झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेज याने संतापाच्या भरात नागमल्लैया यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून शीर धडावेगळं केले. इतकेच नव्हे, तर त्यानंतर कापलेले डोके लाथ मारून कचऱ्यात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
12 Sep 2025 09:37 AM (IST)
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील काकोरी भागात एक मोठा अपघात घडला आहे, जिथे हरदोईहून येणारी रोडवेज बसने नियंत्रण गमावले आणि उलटली. बस प्रवाशांनी भरलेली होती. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. असे म्हटले जात आहे की अनेक लोक बसखाली गाडले गेले आहेत. सुमारे एक डझन लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सर्व जखमींना काकोरी सीएचसीमध्ये नेले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. रस्त्यावर एका टँकरमधून पाणी फवारले जात होते. यादरम्यान, रोडवेज बस टँकरला धडकली आणि नियंत्रण सुटले. त्यानंतर ती २० फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात ३ दुचाकीस्वारांचाही मृत्यू झाला. ते बसखाली गाडले गेले आहेत.
12 Sep 2025 09:35 AM (IST)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी वाय लिमिटेड (IXIGO), एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेड, लुपिन लिमिटेड, रेडिंग्टन लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, हाय-टेक पाईप्स लिमिटेड, बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
12 Sep 2025 09:25 AM (IST)
जळगाव मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव मयुरी गौरव ठोसर (वय 23) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिचा ९ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी १० सेप्टेंबरला कोणीही घरात नसतांना मयुरीने गळफास घेत जीवन संपवलं. आतापर्यंत १० लाख रुपये माहेरच्यांनी मयुरीच्या सासरच्यांना दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
12 Sep 2025 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीनंतरही भाजपमध्ये त्यांच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षावर एकमत झालेले दिसत नाही. यामुळे, नवीन अध्यक्षाची निवड बिहार निवडणुकीपर्यंत प्रलंबित असल्याचे दिसून येते. सध्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा त्यांच्या वाढीव कार्यकाळाचा भाग म्हणून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकांना नड्डा यांच्याजागी लवकरच नवीन अध्यक्ष निवडावा लागणार आहे.
12 Sep 2025 09:15 AM (IST)
पाकिस्तान विरुद्ध ओमान : आशिया कप ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची तयारी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न शुक्रवारी अ गटातील कमकुवत ओमानशी होईल. आशिया कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला ७५ धावांनी हरवले होते, ज्यामुळे त्यांचे मनोबल निश्चितच वाढेल. या सामन्यात फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने हॅटट्रिक घेतली आणि तो पुन्हा एकदा पाकिस्तानसाठी ट्रम्प कार्ड ठरेल.
12 Sep 2025 09:13 AM (IST)
देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज (शुक्रवार) पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात त्यांना शपथ दिली जाईल.अलिकडेच संपन्न झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राधाकृष्णन यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
12 Sep 2025 09:10 AM (IST)
भारतात काल 12 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,050 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,129 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,287 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,499 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 82,870 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 129.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,29,800 रुपये आहे.
12 Sep 2025 09:06 AM (IST)
भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंतचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या दिवसांत लोक आपल्या घरातील निधन झालेल्या पूर्वज, आई-वडील, आजी-आजोबा अशा आप्तांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धा व तर्पण विधी करतात. या पूर्वजांनाच पितृ असे संबोधले जाते. पितृकर्म आणि दानधर्म केल्याने पूर्वज प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे मृत्यूनंतर पिंडदान ही पुढील पिढीने करायची महत्त्वाची परंपरा मानली जाते.
12 Sep 2025 08:56 AM (IST)
सिनेमाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना बार्शीत घडली आहे. लुखमसला (ता. गेवराई, जि. बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून प्रचंड पैसा कमावलेले गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात अडकले होते. लग्न झालेलं असूनही त्यांनी तिच्यावर भरमसाट खर्च केला. मोबाइल फोन, मोटारसायकल, प्लॉट, सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तूंसोबत लाखो रुपयांचा वर्षाव त्यांनी केला. मात्र, नातेसंबंध लवकरच कटू झाले. संबंधित नर्तिका पूजा गायकवाड हिने वारंवार वेगवेगळ्या मागण्या पुढे करून घर स्वतःच्या नावावर करण्याची अट घातली. "माझा वाढदिवस जवळ आहे, घर नावावर केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन," अशा प्रकारच्या धमक्या ती देत असल्याचा आरोप बर्गेंच्या नातेवाइकांनी केला आहे.
12 Sep 2025 08:52 AM (IST)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत शासन निर्णय (जीआर) काढला. या निर्णयानंतर मराठा समाजात समाधान व्यक्त झाले असले तरी ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे.
सरकारच्या या जीआरला आव्हान देत ओबीसी मुक्ती मोर्चाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. या संदर्भात मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी यांनी याचिका दाखल केली आहे.
Marathi Breaking news live updates- नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या घरावर बुधवारी (दि. १०) पुणे पोलिसांनी मोठी झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांना सोनं, चांदी, रोकड तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत.
झडती सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन गुरुवारी (दि. ११) पहाटे चार वाजेपर्यंत चालली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. आंदेकरने आपल्या घराच्या शंभर मीटर परिसरात तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.