लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) तिसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. मुंबई पुण्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे ला पार पडणार आहे. त्यामुळे मुंबईमधील प्रचाराचा वेग वाढला आहे. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सभा, बैठका घेत आहेत. मात्र त्याआधीच मुंबईमधील एक प्रकरण मोठ्या प्रमाणावर तापले आहे. ईशान्य मुंबईमध्ये असलेल्या (Mumbai North East Lok Sabha) एका गुजराती सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद वाढण्याची शक्यता आहे.
घाटकोपमध्ये नेमकं काय घडलं?
ईशान्य मुंबईमध्ये असलेल्या घाटकोपरमध्ये गुजराती मतदारांची संख्या लाखांमध्ये आहे. तसेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गुजराती मतदार असल्याने इथे समूहाने भाजपाला मतदान केले जाते. रविवारी संध्याकाळी घाटकोपर (Ghatkopar) पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार केला जात होता. मात्र या भागात असलेल्या गुजराती सोसायटीने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीमध्ये येण्यास प्रवेश बंदी केली. या सोसायटीमध्ये गुजराती लोकांची संख्या जास्त आहे. रहिवाश्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येण्यास नकार देण्यात आला. तसेच तुम्हाला सोसायटीमध्ये प्रचार करता येणार नाही, असे देखील सांगण्यात आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रचारापासून रोखले जात असल्याचा आरोप स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
घाटकोपमध्ये भाजपच्या नेत्यांना सोसायटीमध्ये प्रवेश
ईशान्य मुंबई मतदारसंघातील गुजराती मतदार मुख्याता भाजपाला मतदान करतात. गुजराती समाजाकडून भाजपाला प्राधान्य दिले जाते, असे आजवर घडत आले आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीमध्ये येऊन प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र भाजपचे स्थानिक आमदार राम कदम हे गुजराती सोसायटींमध्ये जाऊन घरोघरी प्रचार करत असल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरापर्यंत राम कदम हे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन सभा घेत आहेत. राम कदम घेत असलेल्या सभांमध्ये देशात पुन्हा पंतप्रधान मोदींचे सरकार येणे, किती गरजेचे आहे, हे रहिवाशांना सांगत प्रचार करत आहेत.