
थोरल्या डोंगरावरील हे तळे अनेक वर्षांपासून गाळ, दगड, झाडांचा पालापाचोळा, गवत, वेली यांनी पूर्णपणे बुजून गेले होते. त्यामुळे पावसाचे पाणी साठण्याऐवजी वाया जात होते. परिसरातील जलस्रोतांची स्थिती सुधारावी, वन्यजीवांना पाण्याचा आधार मिळावा. भूजलपातळी वाढण्यास हातभार लागावा या उद्देशाने प्रत्यक्ष श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. अनेक हात एकत्रित आले. उन्हाळ्यात अनेक दिवस सातत्याने मेहनत घेत तळ्यातील गाळ, दगड, झाडांचा पालापाचोळा, वाढलेले गवत, वेली हटवल्या. तळ्याचा मूळ आकार पुन्हा तयार झाला. त्यानंतर तळ्याभोवती दगडी तटबंदी उभारण्यात आली.
चंद्रकोरीच्या आकाराच्या या तळ्याची तटबंदी करताना पूर्वेकडील बाजू जाणीवपूर्वक मोकळी ठेवण्यात आली, जेणेकरून डोंगरावरून नैसर्गिकरित्या वाहून येणारे पावसाचे पाणी थेट तळ्यात जमा होईल. जलसंधारणाचा विचार करून केलेले हे नियोजन आज यशस्वी ठरले आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील जैवविविधता, वन्यजीव, पक्ष्यांना मोठा आधार मिळणार असून भविष्यात भूजलपातळी वाढण्यासही मदत होणार आहे.
Disaster News : फळणे वस्ती लगत तापोळा रस्ता खचला १०५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला
या उपक्रमात सातारा पोलिस दलातील सिद्धनाथ शेडगे, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अमोल मोहिते, मीरा शेडगे, ज्ञानेश्वरी शेडगे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी, बालचमूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांच्या सामूहिक श्रमातून कार्य शक्य झाले. हा उपक्रम संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. जलसंधारणाबरोबरच जलस्रोतांचे सातत्याने संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला आहे.
उन्हाळ्यात प्रखर उन्हात केलेल्या श्रमदानाचे फळ आज सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. डोंगरावरील प्रत्येक थेंब अडवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. हा तलाव पाण्याने भरलेला पाहून सर्व मेहनतीचे सार्थक झाले. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. तर प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने वर्षातून काही दिवस श्रमदानासाठी दिले, तर हजारो जलस्रोताला नव संजीवनी मिळते. या श्रमदानातून हेच प्रत्ययास आले. – सिद्धनाथ शेडगे श्रमदानातून निर्माण होणारे समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते.” “निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्या निसर्गाचे ऋण फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मृतप्राय तळ्याला नवजीवन देताना आम्ही केवळ माती, दगड हलवले नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची अमूल्य शिदोरी निर्माण केली आहे. जलसंधारण ही लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक गावाने, नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, तर महाराष्ट्र पुन्हा जलसमृद्ध होईल. – चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे
धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा