
Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्...
मावळमधील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका
दररोज केली जाते सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली
फुलांची निर्यात देशातील विविध राज्यांसह परदेशातही
वडगाव मावळ/सतिश गाडे: इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo) नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे मावळ (Maval) तालुक्यातील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मावळ तालुक्यात गुलाब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील फुलांची निर्यात देशातील विविध राज्यांसह परदेशातही केली जाते. दररोज सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली जाते, त्यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख फुले विमानमार्गे देशभर पाठवली जातात.
मात्र इंडिगोची उड्डाणे रद्द होणे, नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण होणे आदी कारणांमुळे ही लाखो फुले पुण्यासह देशातील विविध विमानतळांवर अडकून पडली आहेत. परिणामी फुले कोमेजणे, खराब होणे यामुळे उत्पादकांना लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परदेशी निर्यातीवरही परिणाम
मावळातील गुलाबांचा काही हिस्सा दुबई, सिंगापूर, मलेशिया अशा देशांमध्येही निर्यात केला जातो. इंडिगोच्या नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे या मालाचीही पाठवणी ठप्प झाली आहे. परदेशी बाजारपेठा वेळेवर पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक भारतीय पुरवठादारांना कॉन्ट्रॅक्ट गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची मागणी : नुकसानभरपाई आणि पर्यायी व्यवस्था
शेतकरी संघटनांनी उड्डाणे रद्द केल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून नुकसानभरपाई, तसेच अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील एअरलाइन्समार्फत तातडीने पर्यायी उड्डाणे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
Indigo संपणार? केंद्र सरकार करणार कडक कारवाई; DGCA ने दिले ‘हे’ अत्यंत महत्वाचे आदेश
उत्पादकांचा आक्रोश
आमची रोजची एक ते दीड लाख फुले देशभर पाठवली जातात. दिल्ली, वाराणसी, लखनौ, गुहवाटी यांसारख्या अनेक शहरांची उड्डाणे रद्द झाल्याने आमचा संपूर्ण माल पुणे विमानतळावर अडकून पडला आहे. या फुलांची किती किंमत मिळेल, मिळेलही का, काहीच सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणावर फुले खराब झाली असून आम्हाला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.”