
राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने पंधरा जागा देऊ केल्याचा प्रस्ताव पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मान्य नाही. विधान परीषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख नाना भानगिरे आदी पदाधिकाऱ्यांची भाजपच्या नेत्यांबराेबर चर्चाही झाली. जागा वाटप सन्मानपुर्व झाले पाहीजे अशी भुमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतली आहे. स्वतंत्रपणे निवडणुक लढविण्याची भुमिकाही काही पदाधिकारी घेत आहेत. पक्षाचे पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांना जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी करून घेतले नव्हते. या सर्व पार्श्वभुमीवर स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला धाव घेतली आहे.
एकीकडे शिंदेंची शिवसेना नाराज असतानाच, भाजपकडून यादी जाहीर केली जाणार आहे. परंतु इच्छुक उमेदवारांना यादीची प्रतिक्षा आहे. भाजपचे पदाधिकारी हे शुक्रवारी मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेले हाेते. त्यांच्याबराेबर चर्चाही झाली आहे. अंतिम यादीतील काही नावांवर एकमत झाले तर काही नावांना आमदारांकडून विराेध केला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने मुळचे भाजपचे इच्छुक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यातील अस्वस्थता बाहेर पडण्याची शक्यता आहे.
दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसची खलबते सुरु
दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या एकत्रीकरणावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या पक्षाच्या नेत्यांच्या चर्चा सुरु हाेत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या तीन दिवसापासून पुण्यात ठाण मांडून आहेत. पक्षात काही प्रवेशही झाले आहेत. भाजपमधील नाराज इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाऊ शकतात.