
ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अलीकडे पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर पक्षांतरांचे प्रमाण वाढले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना इन्कमिंगचा फायदा होताना दिसत आहे. या घडामोडींचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकांतील महायुतीच्या यशानंतर पाच नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला हाेता. मागील निवडणुकीत विजयी झालेले शेवटचे दाेन नगरसेवकही तीन दिवसांपुर्वी भाजपमध्ये गेले. गुरुवारी माजी नगरसेवक अशाेक हरणावळ यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला पुण्यात आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.