ठाणे : ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (वय ४७) यांचा एका टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोरें यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (28 जुलै) सायंकाळी विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट परिसरात त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासही सुरू झाला आहे.
मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील, यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ते आपल्या कुटुंबियांसोबत विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी एका रिक्षाचालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला आणि तिथेच वादावादी सुरू झाली.
हा वाद विकोपाला गेला. रिक्षाचालकाने त्याच्या काही साथीदारांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाणही केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यातच मिलिंद मोरेंना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. तेथील स्थानिकांनी मोरेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अर्नाळा पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत मोरे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.