जळगाव: ग्रामीण भागात अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाचा धंदा करतात. दूग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात एक गाव असं आहे जिथे गावात मतदारांची संख्येपेक्षा गायी आणि म्हशींची (Buffalo Village) संख्या जास्त आहे. या गावाचं संपूर्ण अर्थकारण दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. या गावातून दररोज किमान 1 हजार 600 लिटर दूध इतरत्र पाठविले जाते. हे गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा (Khamkheda). हे गाव मुक्ताईनगर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे.(Milk Producing Village)
[read_also content=”यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरणार खास, आकाशातील ताऱ्याला महामानवाचं नाव https://www.navarashtra.com/maharashtra/dr-babasaheb-ambedkars-name-to-be-given-to-the-star-registry-process-done-nrsr-383244.html”]
हतनुर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये या गावातील नागरिकांची शेतजमीन गेली. त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय नव्हता. त्यामुळे खामखेडा गावातील नागरिक दुध उत्पादनाकडे वळले. या गावची लोकसंख्या बाराशे आहे. या लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी या गावामध्ये पाळल्या जातात. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे साधारण वीस ते पंचवीस म्हशी आहेत. एक म्हैस दररोज दहा ते बारा लिटर दूध देते. या दुधाच्या उत्पादनातून गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. गायी-म्हशींसोबतच कोंबड्यादेखील या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या दुधाची विक्री मुक्ताईनगर तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात व परराज्यातही केली जाते.
माणसांपेक्षा जास्त म्हशींची संख्या
2011 च्या जनगणनेच्या वेळी खामखेडा गावाची लोकसंख्या 1540 होती. त्यापैकी 1030 मतदार आहेत. यातही गावातील अनेक तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत. ते तरुण व लोक गावात आहेत ते दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहेत. 2019च्या पशुगणनेनुसार गावात तब्बल 823 म्हशी व 296 गायींची नोंद आहे. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात त्यापेक्षा जास्त पशूधन आहे. गेल्या सहा दशकांपासून या गावाने दूध उत्पादक गाव आणि म्हशींचं गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या गावात एक सहकारी व एक खासगी दूध डेअरी असून काही तरुण मुक्ताईनगर शहरात घरोघरी जावून दूध विक्री देखील करतात.
दुधाची गुणवत्ता चांगली
या गावातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेतात. गायी, म्हशींच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याने खामखेडा गावातील दुधाची गुणवत्ता खूपच चांगली मानली जाते. यामुळे अनेकजण खामखेडा गावातून येणार्या दूधाला पहिली पसंती देतात. येथील तरुणाईनेही दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग निवडला आहे, जो इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात 5 लाख 77 हजार 302 गायी व 2 लाख 69 हजार 105 म्हशी आहेत. मात्र यापैकी केवळ 1 लाख 52 हजार 439 गायी व 1 लाख 53 हजार 930 म्हशी पैसासक्षम आहेत. यातून होणार्या दूध उत्पादनात खामखेडा गावाचा मोठा वाटा आहे. खामखेडा गावाची कहाणी निश्चितच अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे.






