'संजय राऊतांना राजकीय कावीळ, औषध मी देतो'; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निशाणा
सांगली : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्येकच गोष्टीत पिवळे दिसते. कावीळ झाल्यावर सारे पिवळे दिसते, तसे त्यांचे झाले आहे. या कावीळीवर औषध मिळते. ते लवकरच त्यांना मिळेल, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
सांगलीतील मारुती चौकात शहर भाजपतर्फे केंद्र सरकारच्या 11 वर्षांतील उल्लेखनीय विकासकामांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत छिद्र दिसते. त्यांची नजर पिवळी वाटते. त्यांना कावीळ झाली असून, त्यावर औषध काय ते मला माहिती आहे. औषध मिळेपर्यंत ते असेच करत राहतील.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: शरद पवारांच्या “संधीसाधू लोकांना…” या विधानाचा अजित पवारांकडून एका वाक्यात समाचार; म्हणाले…
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. नंतर पंतप्रधान झाले असून, 11 वर्षे काम करत आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे मिळून 26 वर्षे उच्च पदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. भारतात सोडा जगातही असा विक्रम कुणाला करता आला नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
राज ठाकरे या वादळाची दिशा लवकरच समजेल
मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे वादळी व्यक्तिमत्त्व आहे. वादळाचा जसा अंदाज लावता येत नाही, तसेच राज ठाकरेंबद्दल कोणी ठामपणे काही सांगू शकत नाही. परंतु या वादळाची दिशा काय ते लवकरच आपल्याला समजेल, असे मंत्री पाटील म्हणाले.